Maharashtra

खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर

By PCB Author

November 09, 2022

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये संजय राऊत यांना जामीन देण्यात आला आहे. तब्बल 100 दिवसानंतर संजय राऊत हे तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांना देखील जामिन मिळाला आहे.

गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली आणि संजय राऊत यांना जामीन मिळाला. तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं (ED) केला आहे.

पत्राचाळ प्रकरण काय आहे? मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला. म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.

पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली. पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. EOW कडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केलेले प्रवीण राऊत हे गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत.