खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान

0
5958

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून दुसऱ्यांदा लढण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दंड थोपटले आहेत. शिवसेनेच्या वतीने बारणे यांच्यासाठी रविवारी (दि. २१) आकुर्डी येथे संवाद खासदारांचा थेट जनतेशी हा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु या कार्यक्रमावेळी खासदार बारणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पितामह आणि हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिलेले स्थान महाराष्ट्रातील प्रत्येकाला चीड आणणारी आहे. या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना पायाजवळ स्थान दिल्यासारखे छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्यांच्या पुण्याईमुळे खासदार होण्याचे भाग्य मिळाले, त्यांनाच स्टेजऐवजी पायाशी ठेवल्यामुळे खासदार बारणे आणि शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनीही बारणे यांच्याकडून झालेल्या या कृत्याचा निषेध केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे पाच महिने बाकी आहेत. दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर निवडणुकीच्या राजकीय मशागतीला वेग येणार आहे. पिंपरी-चिंचवडचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. यातील मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे राजकीयदृष्ट्या हॉट सीट मानली जाते. या मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी तयारी चालविली आहे. त्यांनी विविध कार्यक्रम आणि गाठीभेटीद्वारे निवडणूक प्रचारालाही सुरूवात केली आहे. या प्रचाराचाच एक भाग म्हणून रविवारी आकुर्डी येथे संवाद खासदारांचा थेट जनतेशी हा कार्यक्रम घेण्यात आला.

जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यातील एक छायाचित्र पाहिलेत तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत हिंदुह्दयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना पुष्पहार अर्पण करण्याची प्रथा व परंपरा आहे. या परंपरेनुसार रविवारी आकुर्डीत झालेल्या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे व शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी हिंदुह्दयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना पुष्पहार अर्पण केले.

पंरतु, शिवसेनेचे पितामह असलेल्या बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना स्टेजखाली स्थान देण्यात आल्याचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. खासदार बारणे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एका मोठ्या स्टेजवर खुर्चीवर आरामात बसल्याचे आणि बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांची छायाचित्रे स्टेजखाली असल्याचे या छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना पायाशी स्थान देण्याच्या या प्रकाराची निंदा करावी तेवढी कमीच आहे. ज्यांच्या पुण्याईमुळे खासदार होण्याचे भाग्य मिळाले, त्यांनाच स्टेजऐवजी पायाशी ठेवल्यामुळे खासदार बारणे आणि शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनीही या प्रकारांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला वंदनीय आणि पूजनीय आहेत. ते आमचे प्रेरणास्थान सुद्धा आहेत. त्यांच्या छायाचित्रांना पायाजवळ स्थान देण्याचा विचार कोणाच्या मनात सुद्धा येणार नाही. या महान व्यक्तीच्या छायाचित्राला कार्यक्रमासाठी उभारलेल्या स्टेजवर स्थान देण्याएवढे मोठे मन नसेल, तर खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेनेचा खासदार म्हणवून घेण्याची लायकी नाही. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना पायाजवळ स्थान देऊन श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेवरच अतिक्रमण केल्याचे दाखवून दिले आहे. खासदार बारणे यांनी केलेल्या या निंदनीय प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शहरातील सच्चे शिवसैनिक या निंदनीय कृत्याचा जरूर बदला घेतील, असे त्यांनी सांगितले.