खासदार बारणेंची राष्ट्रवादीसोबत मॅचफिक्सिंग; युतीच्या पदाधिकारी बैठकीत शिवसैनिकाकडून पत्रकाचे वाटप

0
1041

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पक्षातच प्रचंड असंतोष असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक मंगळवारी (दि. १९) आकुर्डी येथे झाली. बैठकीला सुरूवात होताच काही नाराज शिवसैनिकांनी बारणे यांच्या विरोधातील पत्रके वाटली. त्यामध्ये बारणेंच्या पाच वर्षांच्या कारभाराचा पाढाच वाचण्यात आला आहे. तसेच बारणे यांनी राष्ट्रवादीसोबत कशी मॅचफिक्सिंग केली आहे, याचाही गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार बारणे यांना पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळेल का?, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे.

“श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण!” या शीर्षकाखाली हे पत्रक वाटण्यात आले. परंतु, बारणे यांच्या एक समर्थक नगरसेवकाने पत्रक तातडीने फाडून टाकले आणि कोणाच्या हाती पडू नये म्हणून गोळाही केले. त्याचप्रमाणे या नगरसेवकाने पत्रक वाटणाऱ्या शिवसैनिकाला शिवीगाळही केल्याचे समजते.

बारणेंच्या विरोधात वाटलेल्या पत्रकात म्हटले आहे, “२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बारणे यांचा मागच्या वेळेस बेडकाचा बैल दाखवून भोकाडी दाखवण्याचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला खर..पण त्यानंतर ५ वर्षे ह्या गड्याने संसद रत्न नावाखाली झोपूनच काढली. प्रत्यक्ष मतदारसंघातील यक्ष प्रश्नाबाबत कुठलेच ठोस निर्णय महाशयांना घेता आले नाही. कायम मतलबाचे राजकारण करणाऱ्या बारणेंनी ज्या कलाटेंनी त्यांच्या उमेदवारी आणि विजयासाठी जीवाचे रान केले, त्याचाच पहिला तळी भंडार करण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चक्क त्याच्या विरोधात उघड प्रचार केला. मनपाच्या निवडणुकीत स्वतः त्यांच्या वॉर्डात राष्ट्रवादीशी भ्रष्ट युती केली. त्यामुळे स्वतःच्या गावातला पॅनलही ते निवडून आणू शकले नाहीत. पडे तो भी टांग उपर, या म्हणीप्रमाणे होवू घातलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नटरंगाणे मा. उद्धव साहेबांचा कोणताही अधिकृत निरोप नसताना, पक्षाच्या सर्व्हेत पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट असताना….त्याची कारणे ही तशीच आहेत. कारण खासदार झाल्यावर शिवसैनिकांची कमी आणि राष्ट्रवादीवाल्यांची धुर्णीभांडी धुण्यात या महाशयांनी पाच वर्षे घालवली. असं असताना कायम शिवबंधन असलेला सच्चा शिवसैनिक असल्याचा कायम खोटा आव आणला.

याच बोगस वागण्यातून काल सोनाई मंगल कार्यालयात स्वतःला अधिकृत स्वयंघोषित खासदारकीचा उमेदवार म्हणणाऱ्या बारणेच्या सभेला फक्त २५० कार्यकर्ते उपस्थित होते. पाच वर्षे स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत चाललेली मॅचफिक्सिंग मात्र जनतेच्या लक्षात आली आहे. कारण लोकसभेत पराभूत होऊन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा लढण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून घेऊन बसला आहे. मा. उद्धवजी….मा फडणवीस साहेबांना माझी पोटतिडकीने विनंती आहे की वाघाचे कातडे घालून कुणी वाघ होत नाही. माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान पदी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी एकेक सीट महत्त्वाचे असताना अशा खंडोजी खोपडेंना तिकीट जाऊन युतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला म्हणून हा सर्व मागोवा आपणा समोर ठेवत आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.