Desh

खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा

By PCB Author

June 22, 2021

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द ठरवत धक्का दिला होता. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपये दंडही ठोठावला होता. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे.

शिवेसनेचे नेते माजी मंत्री आनंदराव आडसूळ यांनी नवीनत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सर्व पुरावे पाहून नवनीत राणा यांचे ते जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्या निकालावर प्रतिक्रीया देताना राणा यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार असून २०२४ पर्यंत आपणच खासदार असल्याचे ठामपणे सांगितले होते. निकालानंतर शिवेसनेने अमरावती मध्ये मोठा जल्लोष केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन राणा यांना मोठा दिलासा दिला आहे.