खासदारांच्या निलंबनाबाबत संसदेच्या आवारात विरोधकांची जोरदार निदर्शने; खासदारांना जया बच्चन यांनी वाटले चॉकलेट आणि पापड. कारण..

0
288

नवी दिल्ली, दि.०१ (पीसीबी) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरूच आहे. आजही विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्याचवेळी, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाबाबत संसदेच्या आवारात विरोधकांचे जोरदार निदर्शने सुरू आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संसदेच्या संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी खासदार जया बच्चन यांनी खासदारांना चॉकलेट टॉफी आणि आंब्याचे पापड दिले, यामुळे त्यांना आंदोलन करताना बळ मिळेल, असे त्या म्हणाल्या. अशाप्रकारे बच्चन यांनी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा दर्शविला.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल निदर्शनास आणून दिले होते की, नियम 256 नुसार खासदारांचे निलंबन त्याच संसदेच्या अधिवेशनात केले जाऊ शकते. संसदेच्या पुढील अधिवेशनात होणारी ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसणे हास्यास्पद आहे. मी विरोधी खासदारांना विनंती करतो की किमान पश्चात्ताप तरी करावा. आज आम्ही लोकसभा चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. विरोधकांची भूमिका काय आहे ते पाहू. आम्हाला लोकसभा चालवायची आहे, ते म्हणाले. मात्र 12 खासदारांच्या निलंबनाव्यतिरिक्त, विरोधी पक्ष संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेत विधेयके परत घेण्यात आल्याचाही निषेध करत आहेत. विधेयक मंजूर करण्यापूर्वी एमएसपी, 700 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू इत्यादी अनेक विषयांचा विचार केला गेला नाही आणि त्यावर चर्चा झाली नाही, असे विरोधकांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळासाठी 12 खासदारांना निलंबित करण्यात आले. हे नियमांमध्ये बसत नसल्याने खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी राज्यसभेत केली होती. मात्र, यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी निलंबन रद्द करण्याची विनंती फेटाळून लावली. याचाच निषेध म्हणून आज विरोधी पक्षाचे निलंबित खासदार दिवसभर आंदोलन करणार आहेत. TMC खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की, “राज्यसभेतून निलंबित केलेले बारा विरोधी खासदार 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संसद संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरतील.” त्याप्रमाणे, विरोधकांचा विरोध सुरूच आहे.

निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाईसह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) इलामाराम करीम, काँग्रेसच्या फूलदेवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासीर हुसेन, अखिलेश प्रताप सिंग, डोला सेन, तृणमूलच्या शांता छेत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनय विश्वम यांचा समावेश आहे.