खासदार उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

0
2564

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आज (सोमवार)  हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला आतापर्यंत  हजारभर धमक्यां आल्या आहेत. त्यात साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीनेही धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अॅड.सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (सोमवार)  उच्च न्यायालयाबाहेर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते बोलत होते. त्यावेळी एका मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत जालन्याच्या वैद्यनाथ पाटील यांने सदावर्ते यांच्यावर हल्ला  केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, येथील पोलिसांनी सहकार्य केले नाही. त्यांनी आपला छळ केला, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी सदावर्तेंना प्रसार माध्यमांशी बोलण्यासही मनाई केली आहे.