Maharashtra

खासदार उदयनराजे भाजपमध्ये आले, तर आनंदच होईल – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले, तर आम्हाला आनंदच होईल, पण  निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून   उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची  चर्चा रंगू लागली आहे. भाजपमध्ये जायचे की नाही हा निर्णय माझ्या मनाप्रमाणे मी घेईन असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री  फडणवीस यांनीही  उदयनराजे  भाजपमध्ये आले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले अनेक  नेते भाजपमध्ये आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उदयनराजे भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी तुमच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे विचारले असता चर्चा तर होणारच असे उदयनराजे यांनी म्हटले होते. आता  आगामी काळात उदयनराजे राष्ट्रवादीला  सोडचिठ्ठी देणार  का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.