खासदार आनंदराव अडसूळ अमरावतीऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता

0
2923

अमरावती, दि. ९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावती मतदारसंघात राजकीय वातावरण प्रतिकूल असल्यामुळे विद्यमान शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याचे समजते. पक्षातूनच होणाऱ्या विरोधांमुळे पक्षश्रेष्ठींनीही खासदार अडसूळ यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात न उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. तसेच मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती पाहता स्वतः अडसूळ यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.

पश्चिम महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. लोखंडे हे मूळचे भाजपचे आहेत. ते तीनवेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्यावेळी या मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे हे शिवसेनेकडून निवडून आले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत वाघचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेकडे या मतदारसंघात उमेदवारच नव्हता. त्यामुळे भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आणि विजयी झाले. परंतु, खासदार झाल्यानंतर लोखंडे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. त्यांनी शिवसेनेपासून चार हात दूर राहणेच पसंत केले.

शिवसेनेचे खासदार असूनही पक्षात कधीच न रमलेल्या लोखंडे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच युती न झाल्यास लोखंडे हे भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे नाव पुढे येत आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात कोणताही संपर्क न ठेवणे, विकासकामांचा पाठपुरावा न करणे, कार्यकर्त्यांना पाठबळ न देणे, पक्षवाढीसाठी शून्य प्रयत्न यांमुळे खासदार अडसूळ यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यास शिवसेनेतूनच प्रचंड विरोध होत आहे. आनंदराव अडसूळ हे २००९ मध्ये अमरावती मतदारसंघाचे पहिल्यांदा खासदार झाले. त्यावेळी अमरावती जिल्ह्यात मुंबईसारखीच शिवसेनेची संघटनात्मक बांधणी होईल, अशी शिवसैनिकांना अपेक्षा होती. परंतु, अमरावतीतील शिवसैनिकांची ही अपेक्षा पूर्णतः फोल ठरली आहे. अडसूळ यांच्या राजकीय कामगिरीमुळे अमरावतीतून शिवसेना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अडसूळ यांचे अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांसोबत राजकीय सख्य नाही. सर्वांसोबत गटबाजी असल्यामुळे अमरावती मतदारसंघात शिवसेना रसातळाला गेली आहे.

आनंदराव अडसूळ हे खासदार झाल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात अडसूळ यांना आपला मुलगा अभिजीत अडसूळ वगळता अन्य दुसरा आमदार निवडून आणता आला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यामुळे खासदार अडसूळ यांचे नेतृत्व सर्वमान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ते आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांचा पराभव अटळ असल्याचे बोलले जाते. या सर्वाचा परिपाक म्हणजे खासदार अडसूळ यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढवण्याचा पक्षश्रेष्ठींकडून विचार सुरू आहे. स्वतः अडसूळ यांनीही अमरावतीऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

खासदार अडसूळ यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याचेही बोलले जात आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तर अमरावती मतदारसंघ भाजपला देण्याचाही विचार शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून सुरू असल्याचे समजते. भाजपनेही या मतदारसंघात स्वबळाची जोरदार तयारी चालविली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या भाजपकडून तगड्या आणि विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. खासदार अडसूळ यांची सर्व मदार भाजपकडून मिळणाऱ्या पाठबळावर अवलंबून आहे. परंतु, अडसूळ यांना भाजपकडूनही फारसे पाठबळ मिळताना दिसत नाही. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे. अडसूळ यांना पुन्हा याच मतदारसंघात उभे करून पराभव पाहण्यापेक्षा त्यांना अमरावतीऐवजी शिर्डी मतदारसंघात उमेदवारी देऊन अमरावती मतदारसंघ भाजपला देण्याचा शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून विचार सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली. ही सर्व बदलती राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.