Maharashtra

खासदार अडसूळांची बदनामी केल्याने आमदार रवी राणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By PCB Author

July 30, 2018

अमरावती, दि. ३० (पीसीबी) – खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई येथील दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची दिशाभूल करणारी माहिती माध्यमांना देऊन बदनामी केल्या प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांनी रविवारी (दि.२९) अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आनंदराव अडसूळ हे दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेत खातेदार व कर्मचाऱ्यांच्या ठेवीतील रकमेत कोटय़वधी रुपयांचा कथित घोळ झाल्याची तक्रार राणा यांनी राष्ट्रपती कार्यालयात केली होती. खासदार अडसूळ यांनी राजकीय पदाचा वापर करून बँकेतील खातेदार, पेन्शनधारक व कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रकमेवर गदा आणल्याचा आरोप रणा यांनी केला होता. या घोटाळ्यात अडसूळ यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांचा सहभागी असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

मात्र सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेची एकूण संपत्ती ही ८०० कोटींची आहे. त्यामुळे ९०० कोटी रुपयांचा घोटाळा होणार कसा, असा प्रश्न अडसूळ यांनी उपस्थित केला होता. ४०० कोटींचे कर्ज, ९० कोटींचे एनपीए असून ७० कोटी कर्जाची वसुली झाली. दोन शाखा व्यवस्थापकांकडून हे प्रकरण झाल्याने त्यांची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या प्रकरणात कारवाई झाल्याचे खासदार अडसूळ यांचे म्हणणे आहे.