खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड रुग्णालयात 15 दिवस सेवासक्ती, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

0
257

पुणे,दि.१८ (पीसीबी) : पुणे पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. दोन्ही शहरांतील खासगी डॉक्टरांची सेवा अधिगृहीत केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कोव्हिड 19 सेंटर, कोव्हिड 19 रुग्णालयात सर्व डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती करण्यात आली आहे. जे डॉक्टर सेवा देणार नाही त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुण् शहरात कोरोना रुग्णांची सुमारे १५००-१६०० च्या प्रमाणात तर पिंपरी चिंचवड मध्ये ७०० च्या प्रमाणात वाढते आहे. मृतांची संख्याही वेगात वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटल कमी पडतात. गंभीर झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेर मिळत नसल्याने मृत्यू आल्याच्या दोन्ही शहरात दोन घटना घडल्या. महापालिकेची यंत्रणा खूपच कमी पडत असल्याने आता खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आएमए, निमा, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन अशा विविध संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि कोरोनासाठी सार्वजनिक रुग्णालयात सेवा देण्याची विनंती केली आहे. डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रसंगी खासगी दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांना आता कोव्हिड 19 सेंटरमध्ये सक्तीने 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. या आदेशातून 55 वर्षांवरील आणि काही आजार असलेले डॉक्टर वगळण्यात आले आहेत. तुम्ही कुठे सेवा देणार यासंदर्भात येत्या तीन दिवसात डॉक्टरांनी माहिती द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.पुणे शहरात सध्या कोव्हिड 19 सेंटर वाढवण्यात आले असून त्यासाठी पालिकेकडे डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांना आता 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुणे, पिंपरी पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (18 जुलै) दिवसभरात 1904 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची आकडेवारी 46 हजार 872 वर पोहचली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 29 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 1243 वर पोहचली. शुक्रवारी दिवसभरात 773 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 हजार 107 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड आएमए चे अध्यक्ष डॉ.सुहास माटे म्हणाले, एका रात्रीत हॉस्पिटलस् कशी उभी राहणार याबाबत शंका आहे, पण कर्तव्य भावनेतून आमचे डॉक्टर्स सहकार्य करायला तयार आहेत. शहरात आएमएचे ६५० डॉक्टर सदस्य आहेत.

पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजीव दात्ये म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे ५० लाखाचे विमा संरक्षण आहे ते सर्व डॉक्टरांना मिळायला पाहिजे. शेवटी डॉक्टरही माणूस आहे, पण जोखीम घ्यायची म्हटल्यावर त्यांनाही जीवन मरणाची चिंता असते. कोरोनासाठी आवश्यक संरक्षण कीट, विमा आदी सुविधा मिळाल्या तर आम्हीही सेवा देण्यास तयार आहोत.