Maharashtra

खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

By PCB Author

March 23, 2020

 

मुंबई, दि.२३ (पीसीबी)- फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत अशांवर पोलीसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली. खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाववर नियंत्रण मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले,तसेच पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपस्थित होते.