खराब कामगिरीनंतर राहुलची भावनिक पोस्ट, म्हणाला…

0
460

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. शेवटच्या साखळी सामन्यात दमदार शतक ठोकणारा लोकेश राहुल उपांत्य फेरीत मात्र केवळ १ धाव करून माघारी परतला. या पराभवानंतर लोकेश राहुलने एक भावनिक पोस्ट केली आहे.

“(विश्वचषक स्पर्धा २०१९) हे आमचे स्वप्न होते. पण दुर्दैवाने हे स्वप्न संपुष्टात आले. गेल्या ६ आठवड्यांमध्ये आम्ही संघ आणि देश म्हणून खूप भक्कमपणे उभारी घेतली. साऱ्या चाहत्यांना माझ्याकडून धन्यवाद”, अशा शब्दात त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली.

दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. भारताचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला.

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सातव्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेरच्या षटकात झटपट धावा करणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. रविंद्र जाडेजा आणि धोनीच्या मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे भारताचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या. या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.