खराडीत भरधाव कारच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू

0
892

पुणे, दि. २० (पीसीबी) – भरधाव होंडा सिटी कारने दिलेल्या जोरदार धडकेत आजी-नातवाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खराडीतील रेडिसन हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर होंडा सिटी कारचा चालक फरार झाला आहे.

शांताबाई साहेबराव सोनवणे (वय ६१) आणि नयन रमेश मोकळे (वय ११) असे मृत आजी-नातवाची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कारमधील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या समारास होंडा सिटी (एमएच/१२/ एलडी/१०११) या कारने काही वाहनांना रेडीसन हॉटेलसमोर धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली होती. त्यावर चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच शांताबाई आणि त्यांचा नातू नयन या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातात एका ४० वर्षीय इसमदेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाता नंतर कार चालक फरार झाला असून चंदननगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.