Maharashtra

खड्ड्यांवरून मनसेकडून सरकारची कोंडी; मनसैनिकांनी मुंबईत मंत्रालयासमोरील रस्ता खोदला

By PCB Author

July 17, 2018

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – यंदाच्या पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याणमधील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. मुंबईतील सायन-पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेत पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. त्यानंतर सोमवारी (दि. १७) मध्यरात्री उशिरा मनसे कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला आहे.

सर्वसामान्यांना होणारा त्रास, सामान्य नागरिकांचे खड्ड्यांमुळे जाणारे जीव या सर्वाची जाणीव सरकारला व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. मनसैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर खड्डे खोदून सरकारचा निषेध केला. कुदळ-फावडे आणि छन्नीच्या सहाय्याने हा रस्ता खोदण्यात आला.

मुंबई, ठाणे, कल्याणमधील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची सरकारला जाणीव व्हावी यासाठीच हा रस्ता खोदल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा गाठ मनसेशी आहे, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यापूर्वीच दिला होता. तसेच मनसेचे आंदोलन म्हणजे गुंडगिरी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.