खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्याच गाडीचा अपघात

821

औरंगाबाद, दि.५ (पीसीबी) – राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल सातत्याने नागरिकांकडून आवाज उठवला जातो. तरीही त्याकडे सरकारचे दुर्लक्षच होत असते. अनेकदा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्राणही गमवावा लागला आहे. आता रस्त्यातील खड्ड्याचा दणका तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच बसला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गावर पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची गाडीच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात पुलावरून कोसळली.

गेल्या आठवड्यात राष्ट्रावदी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव आशिष मेटे यांनी चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पोस्ट करताना नितीन गडकरी यांना टॅग केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीला जाणारा हा आहे औरंगाबाद-जळगाव हायवे. गेल्या चार वर्षापासुन ह्या अश्या रस्त्यांवरुन जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. आदरणीय नितीन गडकरी साहेब आपण यामध्ये लक्ष घालावे कारण दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढत आहे.

आशिष मेटे यांच्या ट्विटची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना झापले. तसेच रस्त्याची पाहणी करून आठवड्याच्या आत स्थिती सुधारण्याचे आदेश दिले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना बजावले की यात बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा झाल्यास कोणाला माफ केले जाणार नाही. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवा असा इशाराही गडकरींनी दिला होता.