खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होतं; त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती – चंद्रकांत पाटील

0
204

मुंबई,दि.२१(पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी म्हणजेच २३ तारखेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राजीनाम्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

“नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरु होता. आज सकाळी जयंत पाटलांचं ट्विट त्यांनी रिट्वीट केलं आणि मग डिलीट केलं तोपर्यंत आम्हाला आशा होती की ते सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं आम्हाला वाटत होतं. देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि फडणवीसांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलंय. परंतू या मुद्द्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होतं. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती. पण आता यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.” पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी खडसेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपली नाराजी असल्याचं सांगितलं. आपल्यावर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामुळे आपली सहनशक्ती संपली. ४० वर्ष काम करुनही आपल्याविरोधात खालच्या स्तरावर राजकारण करण्यात आल्यामुळे अशा लोकांसोबत काम करणं जमणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं.