Banner News

खडसे यांच्या सत्तांतरामुळे मनपा, जिप मध्येही सत्तांतर होणार का ?

By PCB Author

October 22, 2020

जळगाव, दि. २२ (पीसीबी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितल्याने खडसे भाजपमध्ये राहतात की जातात, हा प्रश्न निकाली निघाला आहे. खडसे यांच्या राष्टवादी प्रवेशाचा फटका जळगाव महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सत्तास्थानी असलेल्या भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर्गत बंड  शमविण्याचे आव्हान असतानाच दुसरीकडे खडसेंच्या पक्षांतराची घोषणा झाल्यामुळे जळगाव जिल्हा भाजपची धडधड वाढली आहे.

जळगाव महापालिकेत स्थायी समिती सभापती पदासाठी गुरुवारी भाजपकडून उमेदवाराची निवड होणार आहे. या पदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. माजी महापौर ललित कोल्हे, मागील वर्षी प्रतीक्षेत असलेले विजय घुगे पाटील, नवनाथ दारकुंडे यांच्यात जबरदस्त चुरस सुरू आहे. त्यासाठी भाजपमध्ये गटबाजीही सुरू झाली आहे.

खडसेंच्या सोबत जायचे, परंतु अपात्रतेचा धोका टाळण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करावा, अशी सूचना नगरसेवकांना मिळाल्याची माहिती आहे. भाजपचा सुमारे ३२ जणांचा स्वतंत्र गट तयार करून गरज पडल्यास सेनेची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे खडसे समर्थकांचे आहेत. विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेलाही या बदलत्या परिस्थितीचा लाभ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय जिल्हा परिषदेत भाजपचे ३४ सदस्य असून त्यातील जिल्ह्याच्या पूर्व भागातील सुमारे १६ ते १८ सदस्य हे खडसे यांच्या समर्थनासाठी वेगळा गट स्थापन करून सोबत राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाला घेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. खडसेंचा एकदा प्रवेश झाला की, पुढील घडामोडींना वेग येईल.

————————