Maharashtra

खडसेंचा वनवास संपवा; ज्येष्ठ मंत्र्यांचा शाहांकडे आग्रह

By PCB Author

October 18, 2018

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा विचार व्हावा, असा आग्रह भाजपच्या काही मंत्र्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे धरल्याचे समजते. मंत्रिमंडळात समावेश शक्य नसल्यास खडसे यांना पक्षसंघटनेत तरी मोठी जबाबदारी द्यावी, पण खडसे यांचा वनवास संपवावा, पक्षासाठीही ते चांगले होईल, अशी काही वरिष्ठ नेत्यांची भावना आहे.

मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यातूनच सरकारमध्ये फडणवीस आणि खडसे यांचे सूर जुळू शकले नाहीत. भोसरीतील जमीन प्रकरणासह गैरकारभाराचे आरोप झाल्यानंतर खडसे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गेले तीन वर्षे खडसे सत्तेबाहेर आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली की सातत्याने त्यांच्याबाबत काय निर्णय होणार याबाबत चर्चा सुरू होते.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि संघटनमंत्री रामलाल यांच्यात दिल्लीत प्रदीर्घ चर्चा झाली. या पाश्र्वभूमीवर खडसे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. मध्यंतरी काही वरिष्ठ मंत्र्यांनी अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी खडसे यांना पुन्हा संधी देण्यासाठी मध्यस्थी केली होती. झाली तेवढी शिक्षा पुरे, आता खडसे यांना परत घ्यायला हवे. त्याचा फायदा होईल, असा युक्तिवाद या ज्येष्ठ नेत्यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे खडसे यांचा पुन्हा समावेश करण्याबाबत अनुकूल नाहीत, असे वृत्त आहे.

आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडली आहे. मंत्रिमंडळातील समावेश किंवा प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची माझी तयारी असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.