खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये फरार ‘त्या’ पत्रकाराला अखेर बेड्या

0
188

पुणे, दि. 13 (पीसीबी): खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या पत्रकार देवेंद्र जैनला पुणे शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यापुर्वी पुणे शहर पोलिसांनी आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याला अटक केली होती. पत्रकार देवेंद्र जैनला अटक केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
पत्रकार देवेंद्र जैन हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्याविरूध्द शहरातील काही पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हयांची नोंद आहे. रवींद्र बर्‍हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार, सांगलीचे संजय भोकरे आणि इतरांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापुर्वी रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नी आणि मुलाला देखील अटक केली होती. गुन्हे शाखेचे पोलिस रवींद्र बर्‍हाटेच्या युध्दपातळीवर मागावर होते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटेला अटक केली. त्यानंतर आज पुणे पोलिसांनी देवेंद्र जैन याला अटक केली आहे. त्याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीसनामा ऑनलाइनला माहिती दिली आहे. देवेंद्र जैन याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत सखोल तपास केला जाणार आहे. गुन्हयाचा पुढील तपास पुणे पोलिस करीत आहेत.