Pune

खंडणीची तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदार योगेश टिळेकरांनी धरले फिर्यादीचे पाय

By PCB Author

October 30, 2018

पुणे, दि. ३० (पीसीबी) – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आमदार टिळेकर यांनी चक्क फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार योगेश टिळेकर चक्क फिर्यादी असलेले रवींद्र बराटे यांचे हात जोडून पाय धरताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्या एक कंट्रातदाराला ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेणाऱ्या पोलीस अधिकारी मिलींद गायकवाड यांची बदली देखील करण्यात आली होती. यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले. यानंतर आता टिळेकर यांचा बराटे यांचे हात जोडून पाय धरतानाचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.