क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; संग्रहालयासाठी सीमा सावळेंनी केला होता पाठपुरावा

0
450

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या वतीने चिंचवडगावात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. २३) झाले. स्मारक समितीच्या सदस्यांनी या नियोजित राष्ट्रीय संग्रहालयाच्या उभारणीसाठी महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्ष सीमा सावळे यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानंतर सीमा सावळे यांनी गेले वर्षभर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय संग्रहालयाच्या उभारणीला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम केले. आता या संग्रहालय उभारणीचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यामुळे क्रांतीकारक चापेकर बंधूंचा इतिहास जिवंत ठेवण्याचे पुण्य स्थायी समिती अध्यक्षपदाच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची भावना सीमा सावळे यांनी व्यक्त केली.

चिंचवडगावात क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयासाठी सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सलग १५ वर्षांची सत्ता भाजपने उलथवून लावली. महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना दिले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून सावळे यांनी अध्यक्षपदाच्या एक वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विकास आराखड्याच्या विकासाचा त्यांनी पाया रचला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये चिंचवडगावात क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याचा समावेश आहे.

सीमा सावळे स्थायी समितीच्या अध्यक्षा असताना क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याबाबत सर्व माहिती दिली आणि त्यावर प्रशासकीय कार्यवाही व्हावी, यासाठी समिती सदस्यांनी साकडे घातले. त्यानंतर सीमा सावळे यांनी आपल्या पदाचा पूरेपूर वापर करत क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती उभारण्याच्या आवश्यक सर्व परवानग्या मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच हे संग्रहालय कागदावर उतरवण्यासाठी अधिकाऱ्याकडे तगादा लावला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आणि संग्रहालय उभारण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे भूमीपूजन झाल्यामुळे नियोजित संग्रहालय उभारण्याच्या कामाला गती येणार आहे. येत्या दोन-अडीच वर्षांत हे संग्रहालय प्रत्यक्षात साकारणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून क्रांतीकारक चापेकर बंधूंचा इतिहास जिवंत ठेवण्याचे पुण्यात आपणाला प्राप्त झाल्याची भावना सीमा सावळे यांनी व्यक्त केली. तरूण वयात देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान असणाऱ्या चापेकर बंधूंचे कधीही विस्मरण होऊ न देण्याचे काम हे राष्ट्रीय संग्रहालय करेल, असा विश्वास सीमा सावळे यांनी व्यक्त केला.