Maharashtra

“क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्स केस झाली तेव्हा …’: वानखेडेंचं नवाब मलिक यांना उत्तर

By PCB Author

November 08, 2021

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे नवाब मलिक आणि वानखेडे यांची शाब्दिक चकमक आपल्याला पाहायला मिळतेय. आता मात्र नवाब मलिक यांनी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला असून क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असंही नवाब मलिक म्हणाले होते. त्यावरच आता समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?”, असं म्हणत मलिक यांना वानखेडेंनी स्पष्टीकरण दिल आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी एक नवीन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. या ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे”. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे”