क्या बात! राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटी दरम्यान घातला चक्क मास्क

0
285

पुणे, दि.२१ (पीसीबी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असताना यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली होती.

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची 99 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतं. राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यात त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त गेलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. अगदी मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज विनामास्कच गेले होते. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते. दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.