‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात बक्षीस लागल्याचे सांगून महिलेची ३ लाखांची फसवणूक

0
679

नाशिक, दि. २० (पीसीबी) – ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेच्या प्रश्नमंजुषेत २५ लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करीत भामट्यांनी शहरातील महिलेस तब्बल पावणेतीन लाखांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि. ७) अज्ञात व्यक्तीने महिलेशी मोबाइलवर संपर्क साधला होता. वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क करीत संशयितांनी अभिनंदन करीत आपणास ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखविले. रोकड तुमच्या अकाऊंटवर पाठविण्यासाठी सर्व्हिस टॅक्स आणि बँकेची प्रोसेसिंग फी भरावी लागेल. त्यासाठी व्हॉट्स अॅपवर पाठविलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यावर दोन लाख ८६ हजार ५०० रुपये तत्काळ भरा असा सल्ला ऑनलाइन आरोपींनी दिला. महिलेने विश्वास ठेवून सदरची रक्कम बँक खात्यात भरली. पैसे खात्यात जमा होताच आरोपींनी महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच पीडित महिलेने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.