Pimpri

कोविड कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी देहूरोड येथील संत तुकाराम हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल

By PCB Author

September 25, 2020

देहूरोड,दि.२५(पीसीबी) – रुग्णालयात तयार होणाऱ्या कोविड कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचरा कुंडीत उघड्यावर टाकल्या प्रकरणी देहूरोड येथील संत तुकाराम हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तन्वीर शेरमोहम्मद मुजावर (वय 43, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी फिर्यादी मुजावर यांना गोपाळ राव या नागरिकाने माहिती दिली की, देहूरोड येथील संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये तयार होणारा कोविड कचरा हॉस्पिटलमधील कर्मचारी पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या कचराकुंडीत उघड्यावर टाकत आहेत. यामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढत आहे.

फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्क, इंजेक्शन तसेच कोविड रुग्णांच्या जेवणाच्या प्लेट रस्त्याच्या बाजूला आणि कचरा कुंडीत पडलेल्या आढळून आल्या. त्यावरून त्यांनी याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयांकडून होणाऱ्या या अक्षम्य चुका नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधक ठरणाऱ्या आहेत. प्रत्येक घटकाने जबाबदारीने राहून कोरोनाला हद्दपार कारावे लागणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून त्याला सर्व घटकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोविड कचरा उघड्यावर टाकल्यास त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. पोलीस तपासात यातील तथ्य समोर येणार आहे.