जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेतील १९ नगरसेवकांचे पद रद्द   

0
1089

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि ताराराणी आघाडीच्या १९ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, या नगरसेवकांनी निर्धारित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे.

काँग्रेसच्या ६, भाजपच्या ५, राष्ट्रवादीच्या ४, ताराराणी आघाडीच्या ३ आणि शिवसेनेच्या १ नगरसेवकाचा समावेश आहे. यामध्ये अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे आणि हसीना फरास या तीन माजी महापौरांचा समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेत  भाजप १३ ताराराणी १९, काँग्रेस २७, राष्ट्रवादी काँग्रेस १५, शिवसेना ४, इतर २  असे पक्षीय बलाबल आहे.

संदीप नेजदार, दीपा मगदूम, स्वाती येवलूजे, हसीना फरास, अश्विनी रामाणे, किरण शिराळे, सचिन पाटील, विजय खाडे पाटील, नियाझ खान, मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, संतोष गायकवाड, शमा मुल्ला, सविता घोरपडे, वृषाली कदम, रीना कांबळे, गीता गुरव, कमलाकर भोपळे, अफझल पिरजादे  या नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.