कोल्हापूरात महापुरानंतर आता डेंग्यूची साथ

0
761

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर तब्बल चौदा दिवसानंतर ओसरला. दरम्यान गेली आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात उबदारपणा वाढल्याने तसेच पूरग्रस्त भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गोड्या पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत.

त्यामुळे डेंगू आजाराने उचल खाल्ली आहे. गेल्या दोन दिवसात गांधीनगर व कोल्हापूर शहरात एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. कळंबा, उचगाव, नंदगाव, पाचगाव, दऱ्याचे वडगाव येथे डेंगूचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व डेंगूच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी उचगाव व कळंबा येथे एकाच दिवशी संपूर्ण गावभर धूरफवारणी होणार आहे.

कोल्हापूर शहरालगतच्या गावामध्ये पुन्हा एकदा डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक गावात धूरफवारणी आणि स्वच्छतेवर भर देण्याच्या सक्त सूचना जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना केल्या आहेत. पाच गावात १७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभागाला शहरालगतच्या गावासह पूरग्रस्त भागातही आरोग्यविषयक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.