कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड

0
724

कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता नंदकुमार मोरे यांची आज (सोमवार) निवड झाली. तर  भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा ४१ विरुद्ध ३३ मतांनी पराभव झाला. कोल्हापूर महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित होते. उपमहापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भूपाल शेटे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे रिंगणात आहेत.

भाजपनेही निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उतरवल्याने कोणत्याही क्षणी काहीही होईल, या शक्यतेने काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे धोका निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरत आहेत.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी तक्रार केली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरच नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना नेमके अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना महापौर निवडणुकीपासून दूर रहावे लागले.