कोल्हापुरात महादेवराव महाडिक, बंटी पाटलांचे कार्यकर्ते आमनेसामने

0
735

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) –  कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेत  कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला.

 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) कसबा बावडा येथील कारखाना कार्यस्थळावर झाली. गेल्या पंधरा दिवसापासून कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु होते, त्यामुळे याचे पडसाद राजाराम कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटणार हे निश्चित होते.

आज सकाळी अकरा वाजता सभा सुरु होताच महाडिक समर्थकांनी सभामंडपात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याला प्रत्युत्तर देत आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे एकमेकांविरोधातील ईर्षा शिगेला पोहोचली काही क्षणात सभा सुरु होताच दोन वेळा अशाच पद्धतीचा जोरदार गोंधळ उडाला.