Pimpri

कोल्हापुरात पूरग्रस्तांना मदत करताना महापौर राहुल जाधव आणि पोलिसांत बाचाबाची

By PCB Author

August 14, 2019

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील हसूर या गावी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले आहेत. या दरम्यान, महापौर आणि पोलिसांमध्ये पुढे जाण्यावरून बाचाबाची झाली.

पूरग्रस्तांना मदत करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महापौर जाधव यांनी करून सांगितले की, सहकाऱ्यांना घेऊन आम्ही  हसूरच्या दिशेने जात होता. यावेळी  पोलिसांनी  आम्हाला रोखले.

आम्ही ५५ जण पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात आहोत. स्वत: खर्च करून ही मोहीम हाती घेतली आहे. असे असताना कशासाठी रोखता? असा सवाल आम्ही पोलिसांना केला. तासभर विनवणी करूनही पोलिसांनी   सोडण्यास नकार दिला, असे त्यांनी सांगितले.

अजित चौगुले, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक विजय लांडे, प्रमोद बलकवडे, शाम पटेल, सॅडविन मेंझोस यांनी   मध्यस्थी केल्यानंतर केवळ महापौरांना सोडू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. मात्र, मदतकार्यात असणाऱ्या नगरसेवकांना सोडण्यास नकार दिल्यानंतर गोंधळ उडाला. अखेर पोलिसांच्या अरेरावीनंतर पथक दुपारी निघून गेले.