कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक संचारबंदी लागू करा – मंगला कदम

0
712

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तत्काळ काही काळासाठी लॉकडाऊन जाहीर करा, कडक संचारबंदीची नितांत गरज आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य विषद केले आहे.

निवेदनात सौ. कदम म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर ३६९२ सकारात्मक कोरोना बाधित सापडले असून सुमारे १४७२ कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज शंभर – दोनशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे, असे आरोग्य विभागाचा अंदाज आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरकारी तसेच खाजगी रुग्णानलयांमध्ये आताच बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिलीतर शहरातील खाजगी तसेच सरकारी यंत्रणांवर अतिरीक्त ताण येऊन शहरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादेत ठेवण्याचे अवघड आव्हान वैद्यकीय यंत्रणेवर आहे. लॉक डाऊन शिथिल केल्यामुळे नागरीकांची वर्दळ वाढून शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात काही दिवस कडक संचारबंदी लागू करण्याची अत्यंत गरज आहे. अन्यथा शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. सध्यस्थितीमध्ये नवी मुंबई, ठाणे इत्यादी शहरांनीसुध्दा कडक संचारबंदी लागू केली आहे,त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात सुध्दा कडक संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्गांचा वाढता वेग लक्षात घेता व कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ज्याप्रमाणे सुरवातीला मार्च महिन्यात संचारबंदी लागू केली होती त्याप्रमाणे सात दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात यावी. यामुळे नागरीकांवर निर्बंध येऊन कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्यास मदत होईल व शहरातील कोरोना संसर्गांचा वेग मंदावेल आणि शहरातील वैद्यकीय यंत्रणेवर अतिरीक्त ताण येणार नाही, अशी सुचना सौ. कदम यांनी केली आहे.