कोरोना रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचा `हर्डीकर पॅटर्न` काय तो जाणून घ्या…

0
635

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – कोरोनाचा रुग्ण सापडल्याने देशात आणि राज्यात सुरवातीच्या काळात आठवडाभर विशेष चर्चेत असलेल्या २७ लाख लोकसंख्येच्या पिंपरी चिंचवड शहरात आता कोरोनाचा प्रसार खूपच आटोक्यात आला आहे. तीन रुग्ण सापडल्याने पहिलाच झटका बसला आणि महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली होती. एखाद्या योध्याप्रमाणे अहोरात्र सगळी यंत्रणा दिवसरात्र काम करत होती. अचूक नियोजन आणि कुठलाही गाजावाज न करता त्याची कठोर व काटेकोर अंमलबजावणी केल्याने हे यश मिळाले. दोन महिन्यांत गुणाकार होऊन जिथे तीन ते साडेतीन हजारा रुग्ण आणि किमान २००-२५० मृत्यू होतील, हाहाक्कार माजेल अशी अनेकांची अटकळ होती. प्रत्यक्षात कोरोनाला वेसन घालण्यात यश आले. आज या शहरात अवघे ५०० पैकी २५४ सक्रीय आहेत. मृतांचा आकडा २० असला तरी त्यातही शहराबाहेरील १२ जणांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रशासनाला अशीच साथ दिली तर कदाचित येत्या महिनाभरात हे शहर राज्यातील पहिलेच कोरोनामुक्त महानगर असेल. या सर्वाचे श्रेय जाते ते म्हणजे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या शिस्तबध्द, कार्यक्षम, स्वच्छ प्रशासनाला, आता कोरोना रोखण्यासाठीचा `हर्डीकर पॅटर्न` असे नावच पडले आहे.

चीन मध्ये कोरोनाने उच्छाद मांडला होता, त्यावेळी इथे सर्व निश्चिंत होते. दुबईतून आलेल्या एका कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे ११ मार्चला निदर्शनास आले तसे सर्वांचेच डोळे खाडकन उघडले. पिंपरी चिंचवडचे नाव देशभरातील माध्यमांत झळकले. पुढे रोज दोन-तीन रुग्ण मिळू लागले आणि हा आकडा १२ वर स्थिरावला. तोवर मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे या आघाडीच्या शहरात कोरोनाचे नावसुध्दा नव्हते. आठवडाभर पिंपरी चिंचवडकर हे बीबीसी, वॅशिंगटन पोस्ट पासून देशभरातील माध्यमांचेही जणू टार्गेट झाले होते. या संकटाचा सामना करायचे आव्हान पालिका आयुक्त हर्डीकर यांनी स्विकारले. त्यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन हातातले काम बाजुला ठेवा आणि या लढाईत सामिल व्हायचे फर्मान सहकाऱ्यांना सोडले. सुरवातीला जे रुग्ण सापडले त्यांचे नाव, पत्ते, ते कुठून आले, कुठे कोणाला भेटले याचा तपशील गोळा केला. जे कोरोना बाधित होते त्यांना वायसीएम मध्ये दाखल केले आणि जे लोक त्यांच्या संपर्कात होते त्यांना तत्काळ क्वारंटाईन केले. दुसऱ्या बाजुने हे संकट किती मोठे असेल, किती भयंकर रुप धारण करेल याची कल्पना मांडली आणि आराखडा तयार केला. शहरात महापुराचे संकट आल्यावर जी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लागते ती अगोदर तयार केली होती, ती आहे तशीच इकडे कोरोनाच्या आपत्तीसाठी उपयोगात आणली.

वेळीच क्वारंटाईन केल्याचा परिणाम –
रुग्ण सापडला की त्याला रुग्णालयात दाखल करणे आणि दुसरीकडे प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा राबविणे सुरू झाले. पहिल्यांदा वायसीएम आणि नव्याने उभारलेले भोसरी ही दोन रुग्णालये खास कोरोना रुग्णांसाठी सज्ज करून घेतली. ती कमी पडतील असे वाटल्याने मासुळकर कालनीतील १२५ खाटांचे नूतन रुग्णालय, पिंपरीचे १०० जिजामाता रुग्णालय तयार केले. सुमारे पाच हजार रुग्णांवर उपचाराची सोय करून ठेवली होती. जे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी शहरातील शासकीय वसतिगृहे, शाळांच्या इमरती ताब्यात घेतल्या. शहरातील लहान मोठ्या अशा खासगी रुग्णालयांनाही प्रसंगी कोरोना बाधितांवर उपचारासाठी तयारी ठेवा असे आदेश दिले. दुसरीकडे नागरिकांनी काय दक्षता घ्यावी यासाठी घरोघरी पत्रके वाटून जनजागृती सुरू केली. थोडक्यात युध्द सुरू होण्यापूर्वीच सर्व सैन्य, साहित्य, सामग्री, दाणागोटा अशी भक्कम तयार केली.

कोरोनाची पहिली टाळेबंदी सुरू झाली त्यासरशी दुसरा महत्वाचा निर्णय केला. बाहेर देशातून आलेल्यांची कोरोना लक्षणे आहेत नाहीत याची पूर्ण तपासणी करायची. या लोकांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन करायचे. जागतिक आरोग्य संघटनेने फक्त सात देशांतून आलेल्या प्रवाशांचीच तपासणी करायला सांगितले होते, पण हर्डिकर यांनी जोखीम पत्करली आणि विमानाने शहरात येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवली.शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन केले की, तुमच्या शेजारीपाजारी कोणीही विदेशातून आले तर महापालिकेला कळवा. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर रोज २००-२५० फोन सुरू झाले. मलेशिया, फिलिपाईन्स या देशांतून आलेले चार नागरिक सापडले आणि तपासणी केली तर कोरोना बाधित आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवले आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले. त्यासाठीच्या सर्व सुविधांसाठीचा खर्च महापालिकेले केला. शहरातील काही बडी मंडळी ब्राझिल टूर करून आले होते त्यांनाही हयगय न करता होम क्वारंटाईन केले. कुणाचाही मुलाहिचा न ठेवता थोडी सक्त कारवाई केली. त्याचा परिणाम चांगला झाला, कोरोनाचा प्रसार रोखला गेला.

मरकजमुळे संख्या वाढली –
मरकजमध्ये सहभागी ३५ मुस्लिम बांधव होते, पण तपास लागत नव्हता. पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधून काढले. त्यात खराळवाडी, भोसरी, रुपीनगरला दहा जण कोरोना बाधित निघाले. त्यांनी आठवडाभरात किमान २०० लोकांच्या भेटी घेतल्या होत्या त्यांनाही शोधून क्वारंटाईन केले. जवळपास ८६ लोक बाधित झालेले सापडले. भाटनगरची एक दारु विक्रेती महिला येरवड्याला मयतीसाठी गेली होती आणि घरी येताना कोरोना घेऊन आली. तिच्यामुळे भाटनगर, आनंदनगर, इंदिरानगरच्या संपर्कातील ३० लोक बाधित निघाले. शाहुनगरची रहिवासी असलेली पुणे शहरात नायडू रुग्णालयातील परिचारिका बाधित झाली होती. पुणे- मुंबईतून शहरात आलेल्यांपैकी काही सापडले. पोलीस, होमगार्डसुध्दा सापडले. हे संक्रमण रोखण्यासाठी तिसरा उपाय केला. तत्पूर्वी वॅर रुममध्ये डेटा एकत्र केला आणि त्याचे पध्दतशीर विश्लेषण केले. रुग्णाचे नाव, पत्ता आणि त्याचे संगणकावर लोकेशन दाखविणे सुरू केले. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठे रुग्ण असेल तर काय खबरदारी घ्यावी याचीही कल्पना द्याला सुरवात केली. ही पद्धत नंतर पुणे विभागात लागू करण्यात आली.

नागरिकांचेही मोठे सहकार्य –
कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर १५ दिवसांसाठी पूरता बंदीस्त करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने स्वतंत्र यंत्रणाच कामाला लावण्यात आली. जवळपास ४५ ठिकाणे अशी बंदिस्त केली. त्याचाही चांगला रिझल्ट आला. कोरोनाचा प्रसार बाहेर होऊ शकला नाही. यानंतर घरोघरी व्यक्तीगत माहिती गोळा कऱण्याचे काम शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांवर सोपविले. रोज दहा-वीस हजार नागरिकांची माहिती गोळा झाली. कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती कुठे असल्याचा संशय आला तरी तत्काळ पुढचा बंदोबस्त होत असे. अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा,दूध,भाजी, मेडिकल दुकानदारांनाही सॅनिटायझेशन, मास्क आणि वेळेचे बंधन घालून दिले. शहरातील मंडईत होणाऱ्या गर्दीवर तोडगा निघत नव्हता म्हणून अखेर या मंडई बंद केल्या आणि पाच-सहा एकराची मैदाने शोधून तिथे २०-२५ फुटावर एक विक्रेता अशी व्यवसाथा केली. येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर मास्कशिवाय प्रवेश बंदी केल्याने तिथेही चोप लागला.

शहर पंधरा दिवस सील –
पुणे ते पिंपरी नोकरीच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच पुणे शहरात कोरोनाचा प्रकोप झाल्याने तिकडून इकडे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी १५ दिवसांसाठी शहर सील केले. शहरात येणारे एकूण एक रस्ते बंद केले. त्यामुळे ये-जा थांबली आणि कोरोनाचा प्रसार होऊ शकला नाही. शहरातील निराधार, भिकारी, परप्रांती यांच्यासाठी ११ ठिकाणी निवारा गृहे उभी करून त्यांच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली. झोपडपट्टीतील कष्टकरी रोजंदारीवरच्या नागरिकांची उपासमार सुरू झाली होती, त्यावर स्वयंसेवी संस्था, विविध कंपन्यांच्या माध्यमातून जेवण पुरविण्याची व्यवस्था लावून दिली. त्यामुळे लोक जागेवर थांबले आणि प्रसार रोखला. कोरोना बाधत ५०७ पैकी २५४ रिकव्हर झाले. रिकव्हरी रेटसुध्दा चांगला आहे.

दोन महिने महापालिका, डॉक्टर, परिचारीका, पोलीस अशी यंत्रणा राबली. त्यांना राज्यकर्त्यांनीही सहकार्य केले. नागपुरात तुकाराम मुंडे यांच्या एकाधिकारशाहीवर आता सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील काँग्रेस तुटून पडली. इथे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी यंत्रणा पळवली म्हणून यश मिळाले. स्वतः आयुक्त हर्डीकर आपल्या या यशाचे श्रेय शहरातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी, डॅक्टर, पोलीस, लोकप्रतिनिधींना देतात. यापुढेही नागरिकांनी अशीच साथ दिली तर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर पिंपरी चिंचवड असेल असा त्यांचा दावा आहे.

बाधितांचे आकडेच बोलतात –
कोरोनाचा प्रसार रोखला म्हणून राज्यात हे शहर रेडझोन मधून बाहेर ठेवणे सरकारला भाग पडले. अन्य शहरातील कोरोना बाधित आणि मृतांची संख्या पाहिल्यावर पिंपरी चिंचवडची परिस्थिती किती नियंत्रणात आहे ते स्पष्ट होते. रुग्ण व मृतांची संख्या अशी आहे. मुंबई (बाधित-३९,९३२/मृत-११७३),पुणे (६,३२१/२९६), ठाणे (३,४०९/ ७१), नवी मुंबई (२,४६१/४१), कल्याण-डोंबिवली (१,१९१/१९ ), औरंगाबाद (१,३८०/६४), मालेगाव (७३२/५२ ), मिरा भाईंदर (६२५/ १३), पिंपरी चिंचवड (५०३/ २०) अशी अन्य शहरांची रुग्ण संख्या आहे.