“कोरोना रोखण्याऐवजी मोदी सरकार हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त”; अर्थमंत्र्यांच्या पतींचीच केंद्रावर सडकून टीका

0
351

नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात उच्छाद मांडला आहे. आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे.

परकला प्रभाकर म्हणाले कि, “देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. या परिस्थिती केंद्र सरकार आणि त्यांच्या उपाययोजनांचे मूल्यमापन होण्याची गरज आहे. मात्र, त्यांना केवळ आपल्या लोकांच्या मृत्यूचे दु:ख आहे. इतरांचा मृत्यू त्यांच्यासाठी निव्वळ आकडा आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला धोरणात्मक सल्ला दिला होता. पण एका केंद्रीय मंत्र्याने तो असभ्य भाषेत धुडकावून लावला आणि त्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला”, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले.

एव्हडेच नाही तर ते पुढे असाही म्हणाले कि,” देशभरात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रचारसभा घेत आहेत, गर्दी जमवत आहेत. कुंभमेळा सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर या सगळ्यांना जाग येते. मात्र, कहर म्हणजे आता तज्ज्ञ आणि काही लोक या सगळ्याचे समर्थन करत आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व फार धक्कादायक असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले.”

“कोरोना संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. रुग्णालयात उपचार करावे लागत असल्याने लोकांनी साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर अनेक लोक पुन्हा उभे राहू शकत नाहीत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेला आहे. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे. देशातील लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही घटत आहे. रुग्णालये आणि लॅब्स कोरोना चाचण्या करण्यास नकार देत आहेत. देशभरात रविवारी 3.56 लाख कोरोना चाचण्या झाल्या. मात्र, आदल्या दिवशीच्या तुलनेत हे प्रमाण 2.1 लाखांनी कमी आहे. बेडस्, ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांसाठी मारामारी सुरु आहे. मात्र, एकाही राजकारण्याला यामुळे फरक पडत नाही”, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला.