कोरोना रूग्णांशी आपुलकीने वागा : डॉ. शैलजा भावसार , लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड यांच्या वतीने ‘सलाम वॉरियर्स’पुरस्कार

0
444

पिंपरी, दि.1 (पीसीबी) : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांशी सर्वांनी आपुलकीने वागावे, असे रुग्ण मानसिकदृष्ट्या खचू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. ‘या रुग्णाच्या जागी आपण असतो तर’ असा विचार करून त्यांना मानसिक आधार द्या, प्रेमाने वागा. महाराष्ट्रात भोसरी येथे सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यावेळी व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या, आता पीपीईकीट, मास्क, सॅनिटायझर व आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. तसेच स्वॅब टेस्ट करण्यासाठी लॅबची संख्यादेखील वाढली आहे. सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा, यामुळेच आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास भोसरी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार यांनी व्यक्त केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सेवा बजावत असणा-या डॉक्टर, परिचारिका, पोलिस, पोस्टमन, सफाई कर्मचारी यांचा लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड यांच्या वतीने बुधवारी (1 जुलै 2020) भोसरीतील वात्सल्य रुग्णालयात ‘सलाम वॉरियर्स’पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष अरुण इंगळे, डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन मनोज बन्सल, रिजन चेअरमन मुरलीधर साठे, मााजी अध्यक्ष मुुकुंद आवटी, वात्सल्य रुग्णालयाचे डॉ. रोहिदास आल्हाट आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड यांच्या वतीने डॉ. शैलजा भावसार, वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार माने, पोस्टमन मच्छिंद्र रासकर, परिचारिका सुवर्णा नाझरेकर, मीरा शिंदे, कल्पना लबडे, पीएसआय राजकुमार माने, पोलिस कर्मचारी लक्ष्मीकांत पतंगे, ज्ञानेश्वर आल्हाट, संतोष कोकणे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. विनायक पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीएमआरच्या नियमानुसार वायसीएम व न्यू भोसरी रुग्णालयात कोविड 19च्या रुग्णांवर उपचार केले जातात. या पूर्वी मी स्वाईन फ्ल्यू काळात केलेल्या कामाचा अनुभव मला उपयोगी पडत आहे. आता उपचार प्रणाली वाढल्या आहेत. आवश्यक ते साहित्य उपलब्ध झाले आहे. समाधानाची बाब अशी आहे की, पीसीएमसी मध्ये आतापर्यंत एकाही पोलिस कर्मचा-याचा कोविड 19 मुळे मृत्यू झालेला नाही. तीन रुग्ण अत्यवस्थ झाले होते, परंतू त्यांना योग्य उपचार देऊन बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी ठरलो. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घाबरू नये. त्यांना माननीय आयुक्तांच्या सूचनेनुसार ज्यांची घरी व्यवस्था असेल त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. कोविड 19 वर लवकरच लस उपलब्ध होईल, तोपर्यंत सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, योग्य दक्षता घेतली तर आपण यावर नक्कीच विजय मिळवू असा विश्वास डॉ. विनायक पाटील यांनी व्यक्त केला.

मनोज बन्सल म्हणाले की, कोरोनाच्या या जागतिक महामारीमध्ये रुग्णसेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सफाई कर्मचारी, पोस्टमन म्हणजे साक्षात परमेश्वराचे प्रतिरुप आहेत.
डॉक्टर्स डे निमित्त डॉ. विलास साबळे, डॉ. माधुरी आल्हाट, डॉ. संतोष कवडे, डॉ. शंकर गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर ढोकले, स्वागत डॉ. रोहिदास आल्हाट, आभार जीवन सोमवंशी यांनी मानले.