कोरोना रुग्ण व नातेवाईकांनी घाबरुन जावू नये, महापालिकेकडुन सर्वोतोपरी प्रयत्न सुरु

0
398

जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना महापौरांनी दिला धीर

पिंपरी दि. २२ (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडुन सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असुन कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये असा धीराचा सल्ला महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरवासीयांना दिला.

जम्बो कोविड रुग्णालयास आज महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी समक्ष भेट देवुन येथील रुग्णांची व त्यांचे सोबत असलेल्या नातेवाईकांची चौकशी करुन विचारपुस केली. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी रुग्णांना औषध व्यवस्था कशी दिली जाते, जेवनाची व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा, वयोवृध्द रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्था, कर्मचारी व्यवस्थापन, रुग्ण दाखल करण्याची पद्धत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले प्रतिक्षालय याबाबत चौकशी करुन माहिती घेतली. मृतदेहाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टरांची हयगय केली जाणार नाही. तसेच मृतदेह हस्तांतर करताना कुठलीही दिरंगाई होणार नाही त्याचप्रमाणे मृतदेहास टॅग लावण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांनी केल्या.

राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी जम्बो हॉस्पीटल उभारले आहेत. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची व्यवस्था करुन देत कोरोना संसर्ग रुग्णांना सेवा देण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातुन रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे या सर्व रुग्णालयांवर अतिरिक्त भार पडलेला आहे. तरीही शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अफवांकडे दुर्लक्ष करुन महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. तसेच उपचार सुरु असताना घाबरुन न जाता उपचार घेतल्यास निश्चितच आपण कोरोनाचा पराभव करु असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसोबत संवाद साधताना व्यक्त केला. महापालिकेने नेमून दिलेले डॉक्टर्स व त्याबरोबर रुग्णालय व्यवस्थापनाचे डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर यांनाही आवश्यक त्या सुचना केल्या.