कोरोना रुग्णांस प्रतिसाद न देणाऱ्या डॉ. पवन साळवे यांना आयुक्तांची सक्त ताकीद

0
366

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : कोरोनाग्रस्ताला रुग्णालयात दाखल करण्यासाठी फोन करणाऱ्या नागरिकाला प्रतिसाद न देणे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्तांनी त्यांना सक्त ताकीद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणीचे निराकरण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी डॉ. पवन साळवे यांच्यावर आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णाला दाखल करण्याबाबत डॉ. साळवे यांना फोन केला होता. पण त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बाबर यांनी साळवे यांची राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यावर नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी दिलीप वाणिरे यांनी पालिकेला पत्र पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

आयुक्त हर्डीकर यांनी डॉ साळवे यांना समज दिली आहे. डॉ. साळवे यांनी याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करणे गरजेचे होते. योग्य मार्गदर्शन करुन तक्रारीची सोडवणूक तत्काळ करणे अभिप्रेत होते. मात्र त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे डॉ. साळवे यांनी भविष्यात नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी आदरपूर्वक संवाद साधावा. नागरिक, सदस्य व पदाधिकारी यांच्याशी सौजन्याने वागावे. कामाशी निगडीत संभाषण करुन त्यांना योग्य माहिती द्यावी. नागरिकांचे प्रश्न कार्यक्षमपणे प्रथम प्राधान्याने सोडवावे. यामध्ये टाळाटाळ अथवा हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास शास्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.