कोरोना मुळे आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर ?

0
347

मुंबई,दि.९(पीसीबी) – आयपीएलचं १३वं सीजन २९ मार्चपासून सुरु होत आहे. मात्र आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरमुळे रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीएलही रद्द होण्याची शक्यता आहे.

येत्या २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलची सुरुवात होईल, त्यावेळी देशातील तापमानाचा पारा अंदाजे २४-२५ सेल्सिअस अंश असण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोनाचा कहरही कमी होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करावी की नाही, या संभ्रमात बीसीसीआय आहे.

आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भातही बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो. मात्र तसं करणं कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर लक्षात घेत आयपीएलच्या तारखांची घोषणा केली जाते. त्यामुळे आयपीएलची तारीख मागे-पुढे होणे तुर्तास तरी शक्य वाटत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली तर आयपीएल स्पर्धा रद्द केली जाणार हे निश्चित आहे. कोरोना व्हायरस गर्दीमुळे जास्त पसरतो. या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस जगभरात वेगाने परसरत आहेत. जगभरात १०० हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसची रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोना बाधितांचा आकडा ४२ वर आहे. कालपर्यंत देशात ३९ कोरोनाबाधित होते. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली आहे.