कोरोना भोजन सेवेत ‘कमिशन’चा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप खरा किती ?

0
383

– होम क्वारंटाईन नागरिकांवरील आहार खर्चात मोठा घोटाळा
– भोजनदर ४८०, २५० आणि २२५ रुपये

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) : पिंपरी – चिंचवड महापालिकेत कोरोनाग्रस्त आणि होम क्वारंटाईन नागरिकांवरील आहार खर्चात मोठा आर्थिक घोटाळा सुरु आहे. सुरुवातीला अन्नपुरवठादाराला ४८० रुपये दराने आहार खर्च देणाऱ्या महापालिकेविरोधात सर्वत्र वाच्यता झाल्यावर आता काही ठिकाणी २५० रुपये, काही ठिकाणी २२५ रुपये प्रमाणे बिल अदा केले जात आहे. लाखो रुपये पुरवठादाराला देऊनही खाद्यपदार्थांबाबत असंख्य तक्रारी आहेत. पुरवठादार मालामाल झाले आहेत, असे समजले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी याबाबत अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आणि भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांना आव्हान दिल्याने आगामी काळात हे प्रकरण सत्ताधारी भाजपाच्या अंगलट येऊ शकते.

पिंपरी – चिंचवड शहरात १० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. पहिले १२ रुग्णही परदेशातून आले होते. त्यामुळे महापालिकेने परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या संपर्कातील, निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत शहरातील ८ हजार ९७२ नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’ केले. त्यातील २८ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण झालेल्यांना मुक्त केले जाते. पहिल्यांदा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी होता. त्यामध्ये वाढ करत २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी केला आहे. आजपर्यंत २८ दिवसांचा कालावधी पुर्ण केलेले ३ हजार ८४८ जण होम क्वारंटाईन मुक्त झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देखरेखीखाली असलेल्या (होम क्वारंटाईन) नागरिकांना पिंपरी महापालिकेमार्फत जेवण आणि नाष्टा देण्याचे ठरले. त्यासाठी खाद्यपदार्थ पुरवठादारांकडून दरपत्रक मागविण्यात आले. बाणेर रोड येथील टॅब किचन या संस्थेने नाष्टा ८० रुपये (पोहे, उपमा, इडली सांबर, उडिद वडा, एक फळ, चहा / कॉफी, पिण्याचे पाणी), दुपारचे जेवण २०० रुपये (शाकाहारी रस्सा भाजी, शाकाहारी सुकी भाजी, ३ चपाती, भात, पापड, लोणचे, सॅलाड, मिष्ठान्न, पिण्याचे पाणी) आणि रात्रीचे जेवण २०० रुपये प्रति व्यक्ती (शाकाहारी रस्सा भाजी, शाकाहारी सुकी भाजी, ३ चपाती, भात, पापड, लोणचे, सॅलाड, मिष्ठान्न, पिण्याचे पाणी) देऊ असे सांगितले.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १४ एप्रिल २० रोजी टॅब किचन या संस्थेला वर्कऑर्डर दिली.बालेवाडी क्रीडासंकुल येथील वसतीगृह आणि मोशी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहातील होम क्वारंटाईन नागरिकांना ४८० रुपेय दराने आहार देण्याचे फर्मान आयुक्तांनी सोडले. तसेच, भविष्यात ज्या – ज्या ठिकाणी होम क्वारंटाईन ठिकाणे निश्चित करण्यात येतील त्या ठिकाणच्या नागरिकांना जेवण आणि नाष्टयाचा पुरवठा निश्चित केलेल्या वेळेनुसार स्वखर्चाने पोहोच करावा, असे आदेश दिले.

१४ एप्रिलरोजी प्रतिव्यक्ती प्रतिदिन आहार खर्च ४८० रुपये निश्चित झाला असताना अवघ्या सात दिवसात आयुक्तांनी आपल्या आदेशात बदल केला आणि तो दर २५० रुपयांपर्यंत खाली आणला. होम क्वारंटाईन नागरिकांबरोबरच महापालिका तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनाही जेवण पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. बालेवाडी क्रीडासंकुल येथील वसतीगृह आणि मोशी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहातील होम क्वारंटाईन नागरिकांबरोबरच हॉटेल कलासागर, सीआयआरटी गेस्ट हाऊस, एमआयडीसी गेस्ट हाऊस, आणि वायसीएमएच येथील निवासी डॉक्टर्स आणि नर्स यांनाही जेवण आणि नाष्टा देण्याचे ठरले. मात्र, त्यासाठी २५० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला.

मात्र, आहाराचा मेनू बदलण्यात आला. एक कप चहा (१० रुपये), नाष्ट्याला पोहे / उपमा (३० रुपये), दुपारच्या जेवणात भात, चपाती, डाळ/ उसळ/ पालेभाजी,सॅलड (७५ रुपये) , दुपारी एक कप चहा (१० रुपये), रात्री जेवणात भात, चपाती, डाळ/ उसळ/ पालेभाजी (७५ रुपये), पॅकिंग चार्ज ५० रुपये असा एकूण २५० रुपये दर ठरविण्यात आला. आता या दरात आणखी घट झाली आहे. निवारा केंद्रामधील नागरिकांना जेवण आणि नाष्टा उपलब्ध करुण देण्यासाठी मेसर्स साई सेवा एंटरप्रायजेस या पुरवठादाराची नेमणूक करण्यात आली. त्यांना प्रति व्यक्ती २२५ रुपये देण्यात आले आहेत. या संस्थेला आजअखेर ११ लाख ७६ हजार ७५० रुपयांचे बील अदा करण्यात आले.

टॅब किचन कोणाचे –
महापालिकेने टॅब किचन या संस्थेला १४ एप्रिल २०२० रोजी आदेश दिले त्यात ४८० रुपये दर दिला आणि आठच दिवसांत (२० एप्रिल २०२०) तोच दर २५० रुपये केला. आठ दिवसांत किती लोकांन जेवण दिले, त्याचे एकूण बिल किती याबाबत वाच्यता करायला अधिकारी घाबरतात. दामदुप्पट दराने घोटाळा झाल्याचा संशय आहे.