कोरोना बाधित पलायन केलेली महिला पुन्हा रुग्णालयात

267

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या महिलेचा शोध घेतला आणि मोठ्या प्रयत्नांनंतर दीड तासाने तिला ताब्यात घेतले. पुन्हा रुग्णालयात जाण्याची इच्छा नसल्याने संबंधित महिला रुग्णालय कर्मचाऱ्यांना विरोध करीत होती. त्यासाठी तिने हातात लोखंडी सळई देखील घेतली होती. या थरारक घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी अचानक महिलेने कर्मचाऱ्याची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले. ही गंभीर बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्ष्यात येताच त्यांनी तळेगाव पोलिसांची मदत घेत, संबंधित महिलेचा शोध सुरू केला. दरम्यान, दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर तळेगाव दाभाडे येथील वतन नगर येथे महिला असल्याचं समोर आले. एका इमारतीचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ती होती. पीपीई किट घातलेल्या कर्मचारी महिलेला पकडण्यासाठी गेले असता महिला जुमानत नव्हती. हातात लोखंडी सळई घेऊन ती कर्मचाऱ्यांना विरोध करीत होती. अखेर काही जणांनी महिलेला बोलण्यात गुंतवून तिला पकडले. दरम्यान, हे थरार नाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी रुग्णालयातून देखील अशाच प्रकारे कोरोनाबाधित तरुणाने पलायन केले होते. कोरोना झाल्याच्या भीतीने त्याने पलायन केले असल्याचे तेव्हा समोर आले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी तरुणाच्या घरी जाऊन संबंधीत तरुणाच्या आईला फोन करण्यास लावल्यानंतर तरुण घरी येताच त्याला पकडण्यात आले होते. दरम्यान, तेव्हा देखील संबंधित कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांचा घाम काढला होता.