कोरोना बाधितांच्या होम क्वारंटाईन साठी सहकार्य करा – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

0
437

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, पण ते पॉझिटिव्ह आहेत अशा नागरिकांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून महापालिकेला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज फेसबूक लाईव्ह संवादद्वारे नागरिकांना केले. शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून हॉस्पिटलमधील बेडची संख्या मर्यादीत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सराकारच्या सुचनांनुसार होम क्वारंटाईन चा पर्याय गरजेचा आहे, असे त्यांनी स्पष्ठ केले.

आयुक्त म्हणाले, सद्या शहरात कोरोना बाधितांची संख्या २६०० पर्यंत, तर सक्रीय   रुग्णांची संख्या ९५० आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांना कुठलिही लक्षणे नाहीत. आतापर्यंत चांगली गोष्ठ अशी की, १५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ ४० मृत्यू आहेत. आपला शहराचा मृत्यू दर हा १.७ टक्के राहिला आहे. मात्र, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जसजसे लॉकडाऊन शिथील करत चाललो आहोत, तसतशी कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. सर्व काही ऑल इज वेल असे नाही. त्यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे. कायम स्वरुपी सतर्क राहायला हवे.

केंद्राचे आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने आता एका गोष्टीला पुष्ठी दिली आहे की, ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांनी घरी राहून काळजी घेतली तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रसार होणार नाही. मात्र, ज्यांना अन्य दुर्धर आजार आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पुढच्या काळात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आपल्याला येणाऱ्या रुग्णांसाठी बेड मोकळे ठेवायला पाहिजेत. त्यासाठीच कोरोनाची लक्षणे नसतील त्यांची सुविधा कोव्हिड सेंटर किंवा केंद्र शासन व राज्य शासनाच्या सुचनांनुसार घरीच अलगीकरण (होम क्वारंटाईन) करावे लागणार आहे. एखाद्याला लागण झाली तर त्याचा प्रसार अन्य लोकांपर्यंत होऊ नये यासाठी घरातच १७ दिवस बंद खोलीत रहायचे आहे. ज्यांच्या घरी सोय नाही त्यांच्यासाठी काही कॉलेजचे होस्टेल घेतली आहेत. शक्यतो घरातच विलगीकरण व्हायचे आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 

आपण आपल्या घरात एका व्यक्तीला एकटे राहण्यासाठी एक खोली स्वतंत्र असावी. ज्याला टॉयलेट बाथरूम जोडून आहे, अशा खोलीत आपण बिनधआस्तपणे घरातल्या घरात अलगीकरण करू शकता. कुठल्याही प्रकारची धास्ती बाळगायची कारण नाही. आपण जवळच्या माणसांना प्रसार करण्याची शक्यत नाही. खोलीतच राहायचे, मास्क लावून रहायचे आहे. ही दक्षता घेत १७ दिवस एकाच खोलीत रहायचे आहे. घरातील व्यक्तींनी चांगला सकस आहार खोलीच्या बाहेर ठेवला पाहिजे. ताट घ्यायचे व ताट स्वच्छपणे धुवायचे, निर्जंतुकीकरण करायचे. ते डिस्पोजेबल असेल तर उत्तम. रुग्णाने मास्क, प्लेट, सेव्हिंग रेझर असे कुठलेही वापरलेले साहित्य हे बायोमेडिकल वेस्ट मध्ये टाकायचे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा आहे. रुग्णाने स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आहेत. नंतर ते सोडियम हायपोक्लोराईड अथवा ७० डिग्रीपेक्षा जास्तचे गरम पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे निर्जंतुकीकरण होते.

घरातील अन्य कुठल्याही व्यक्तीशी संपर्क येणार नाही याची काळजी रुग्णाने घेतली पाहिजे. निगेटिव्ह झाल्यावर कुठली टेस्ट करायची गरज नाही. पालिकेच्या पीसीएमसी सारथी या एपवर सतत संपर्क करायचा आहे, रोज दोन वेळेला स्वतःचे तापमान घ्यायचे. ताप, खोकला लक्षणे दिसली तर, महापालिकेच्या पथकाला कळवा. वैद्यकीय विभागाने मॉनिटरींग करायचे आहे. आपले घर सर्वात सुरक्षित जागा आहे. अनेकांना शंका असते की कोरोना रुग्ण आपल्या शेजारी असल्याने इमारतीत बाधा होईल का. अशी कुठलिही धास्ती बाळगण्याचे कारण नाही., असे आयुक्त हर्डिकर यांनी स्पष्ट केले. हाऊसिंग सोसायटी धारकांनी मोलकरीण अथवा घरकाम करणाऱ्यांना आडकाठी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

जेष्ठ नागरिक अथवा अन्य दुर्धर आजाराने पिडीत नागरिकांसाठी सुचना आहे. दुर्धर आजार आहे त्यांनी एप डाऊनलोड करा. मात्र, आजार अंगावर काढू नका. कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. मुलांना बाहेर खेळायला पाठवताना खबरदारी घ्या. नागरिक शहरात थुंकताना दिसतात जे लाजिरवाणे, किळवाणे आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, आता ती दंडनीय केलेली आहे. दंड वसूल केला जाईल आणि प्रसंगी फौजदारी दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला.