“कोरोना बद्दल गार्डीयन, अलजजीरा, बीबीसी काय म्हणतात….”

0
322

वॉशिंग्टन, दि.२७ (पीसीबी) : भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने परिस्थिती बिघडलीय. यावर जगाचं लक्ष लागलंय. जगातील अनेक देशांनी या संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात पुढे केलाय. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (26 एप्रिल) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात भारतात 3.52 लाख नागरिकांना कोरोना संसर्ग झालाय. याशिवाय 24 तासात कोरोनामुळे 2812 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 झालीय. तसेच एकूण 1 लाख 95 हजार 123 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या विषयावर वृत्तांकन केलंय.

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय. यावरच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रकाश टाकत भारतातील परिस्थितीवर काळजी व्यक्त केलीय. कोणतं आंतरराष्ट्रीय माध्यम नेमकं काय म्हणतंय याचाच हा स्पेशल रिपोर्ट.

‘भारताला अनेक देशांकडून मदतीचं आश्वासन’ : अलजजीरा
कतारच्या अलजजीरा वृत्तवाहिनीने म्हटलंय, “भारतात कोरोनाचं संकट वाढतंय. अनेक देशांनी भारताला मदतीचं आश्वासन दिलंय. भारत ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याचा सामना करत आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अमेरिकेने भारताला टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर आणि पीपीपी किट देण्याचं आश्वासन दिलंय. तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्यातही सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय.”

‘भारतात दररोज हजारो लोकांचा मृत्यू’ : सीएनएन
अमेरिकेचा प्रतिष्ठित न्यूज चॅनल सीएनएनने भारताच्या परिस्थितीवरील वृत्ताचं हेडिंग ‘भारतात कोरोनाचं जागतिक विक्रम तुटला, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनही नाही” असं केलंय. या वृत्तात म्हटलंय, ‘भारतात कोरोनाची दुसरी लाट प्रत्येक दिवशी हजारो लोकांचे जीव घेतेय. वाढत्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न सुरु आहेत. मागील 2 आठवड्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. तसेच रुग्णांना आयसीयू बेड्सची कमतरता असल्याने रुग्णांना तासंतास रुग्णालयांबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे.”

‘रुग्णालयात बेड्सची कमतरता, घरांमध्ये रुग्णांची स्थिती बिकट’ : बीबीसी
ब्रिटिश ब्रॉडकॉस्टर बीबीसीने भारतातील परिस्थितीवर वृत्तांकन करताना ‘रुग्णालयात बेड्सची कमतरता, घरांमध्ये रुग्णांची स्थिती बिकट’ असं हेडिंग दिलंय. या वृत्तात लिहिलंय, “दिल्लीसह देशभरात अनेक रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता आहे. त्यामुळेच रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगितलं जात आहे. नागरिकांना काळ्या बाजारातून वैद्यकीय साहित्य खरेदी करावं लागत आहे. काळ्या बाजारात वैद्यकीय सामग्री आणि ऑक्सिजनच्या किमतीने आकाशाला गवसणी घातलीय.’

‘ऑक्सिजन तुटवड्यावर डॉक्टरांकडून काळजी व्यक्त’ : द गार्डियन
ब्रिटनचं वृत्तपत्र द गार्डियनने ‘भारत कोरोना संकट: ऑक्सिजनच्या तुटवड्यावर डॉक्टरांकडून चिंता व्यक्त’ असं हेडिंग दिलंय. या वृत्तात म्हटलंय, “भारतात लोक घरांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा साठा करत आहेत. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा पडत आहे, असं मत वरिष्ठ डॉक्टर व्यक्त करत आहेत. लागोपाठ पाचव्या दिवशी भारतात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत.”