कोरोना नोव्हेंबर २०१९ मध्येच भारतात -शास्त्रज्ञांनी वर्तविला अंदाज

0
300

देश,दि.४(पीसीबी) देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक माहिती शास्त्रज्ञांकडून समोर आली आहे. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी, केरळमध्ये करोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झालेली आहे. मात्र असे असले तरी कोरोनाने नोव्हेंबर २०१९ मध्येच देशात शिरकाव केलेला होता, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाला होता, अशी माहिती ‘मोस्ट रिसेंट कॉमन एनसेस्टर’ (एमआरसीए) द्वारे समोर आली आहे.

देशभरातील प्रमुख संस्थांमधील वरिष्ठ शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, चीनमधील वुहान येथील करोनाचा मूळ विषाणू हा ११ डिसेंबर २०१९ पर्यंत पसरत होता. ‘एमआरसीए’ या तंत्राचा वापर करत शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, तेलंगण व अन्य राज्यांमध्ये पसरत असलेल्या विषाणुची उत्पत्ती २६ नोव्हेंबर आणि २५ डिसेंबर दरम्यान झाली होती. याची सरासरी तारीख ११ डिसेंबर मानली जात आहे. तर, ३० जानेवारी अगोदर चीनमधून आलेल्यांमुळे भारतात हा विषाणू पोहचला का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण, त्या काळात देशात कोविड-१९ च्या तपासण्या मोठ्याप्रमाणावर सुरू झालेल्या नव्हत्या.
हैदराबादेतील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजी’ (सीसीएमबी) च्या शास्त्रज्ञांसह अन्य शास्त्रज्ञांनी केवळ कोरोना विषाणुच्या कालावधीचा अंदाज लावला आहे. तसेच, त्यांनी विषाणुच्या नव्या प्रजातीचा शोधही लावला आहे. जी सध्याच्या विषाणू पेक्षा वेगळी आहे. संशोधकांनी याला क्लेड I/A3i असे नाव दिले आहे. या नव्या विषाणुचा संसर्ग तामिळनाडू, तेलंगण, महाराष्ट्र व दिल्लीत मोठ्याप्रमावर होत आहे. या विषाणूची उत्पत्ती चीनमध्ये नाही झालेली तर दक्षिण-पूर्व आशियात झाली असल्याचेही समोर आले आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत नऊ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता कोरोनानं ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात दिवसाला आठ हजारांनी वाढणारी रुग्ण संख्या आता ९ हजारांकडे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.