“कोरोना नंतर मेंदू दहा वर्षांनी म्हातारा, आकलनशक्तीवर परिणाम” – शास्त्रज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष

0
555

लंडन, दि. २९ (पीसीबी) : इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या अॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास गटाने 84 हजार कोरोना रुग्णांवर संशोधन केले आहे. यात असंही दिसून आलंय की कोरोनाच्या काही गंभीर प्रकरणात काही महिन्यांच्या काळापर्यंत रुग्णांच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो. अशा रुग्णांच्या आकलनशक्तीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून आलंय.

संशोधकांनी त्यांच्या अहवालात असे म्हंटले आहे की जे रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत, ज्यांच्यात आता कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत त्यांच्या आकलनशक्तीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. पझलवरील असलेले डॉटस् जोडणे किंवा शब्द लक्षात ठेवणे यांसारख्या आकलन विषयक चाचण्यामुळे मेंदूचे कार्य कसे चालते हे लक्षात येते. अशा प्रकारच्या चाचण्यांचा वापर अल्झायमर या आजाराचे निदान करण्यासाठी केला जातो. तसेच मेंदूच्या आकलनावरचे तात्पुरते झालेले परिणाम शोधण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात.

अॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यास गटाने 84,285 लोकांचा अभ्यास केला. या लोकांनी ग्रेट ब्रिटिश इंटेलिजन्स टेस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. हा अहवाल MedRxiv या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. परंतु अहवालाचा अजून इतर तज्ञांनी अभ्यास केलेला नाही.खासकरुन जे लोक कोरोनाच्या संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यांच्या आकलनशक्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 20 ते 70 वयोगटातील लोकांच्यात हे जास्त दिसून आले आहे. काही केसेस् मध्ये तर मेंदू तब्बल दहा वर्षाने म्हातारा झाला आहे असे दिसून आल्याचे एका संशोधकाने सांगितले. या संशोधनात भाग घेतला नसलेल्या काही शास्त्रज्ञांनी या संशोधनावर सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ज्या लोकांचा यात अभ्यास करण्यात आला आहे त्यांच्या मेंदूचा पूर्वअभ्यास किंवा पूर्व माहिती यात नव्हती. तसेच यात दीर्घकालासाठी मेंदूच्या आकलनाची स्थिती कायम राहते असाही उल्लेख नाही. त्यामुळे कोरोना काळात मेंदूच्या आकलनावर जे काही परिणाम झाले असतील ते कमी कालावधीसाठी असतील असे मत एडिनबर्ग विद्यापीठाचे प्राध्य़ापक जोएना वार्डलॉ यांनी मांडले आहे.

लंडन कॉलेज विद्यापीठाचे मेडिकल इमॅजिंग सायन्सचे प्राध्यापक डेरेक हिल यांनी या संशोधनावर त्यांच मत व्यक्त केले. ते म्हणतात, “या संशोधनामधून बाहेर आलेली माहिती ही जास्त भरवशाची नाही. कारण यात संबंधीतांच्या मेंदूचा कोरोनाचा ‘संसर्ग होण्याआधी’ आणि ‘कोरोना झाल्यानंतर’ असा अभ्यास केला नाही. तसेच यात सामील झालेल्या बऱ्याच लोकांना ते स्वत; कोरोनाग्रस्त असल्याचं वाटत होते, त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली नव्हती. हा अभ्यास वैचित्र्यपूर्ण तसेच कोणताही निष्कर्ष काढणारा नाही.”

कोरोनाचा मानवी मेंदूच्या आकलनावर नेमका काय परिणाम होतोय हे समजून घ्यायचे असेल तर हा अभ्यास अधिक व्यापक करुन कोरोनाच्या संसर्गानंतर काही आठवडे आणि महिन्यांच्या कालावधीत सातत्याने करावा लागेल. त्यावेळीच समजेल की मेंदूच्या आकलन क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे का नाही असेही प्राध्य़ापक हिल म्हणाले.