Videsh

‘कोरोना नंतरही २-३ महिने दम लागणे, चिंता आदी त्रास’ – ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून पुढे आला निष्कर्श

By PCB Author

October 20, 2020

लंडन,दि.२०(पीसीबी) : ब्रिटेनमध्ये केलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालात कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी गंभीर बाब समोर आली आहे. या अहवालात सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या रुग्णांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडल्यावरही जवळपास 2-3 महिन्यापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत होती. यात दम लागणे, थकवा, चिंता आणि इतर अनेक लक्षणांचा समावेश आहे.

ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं आहे. सर्व्हेक्षणात जवळपास 58 रुग्णांना रुग्णालयातून सोडल्यानंतरही मोठा काळ कोरोनाच्या लक्षणांचा त्रास होत होता.

‘कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या अनेक अवयवांवर परिणाम’ : संशोधन अभ्यासानुसार, काही कोरोना रुग्णांच्या शरीरातील अनेक अवयवांमध्ये त्रास होत असल्याचं दिसून आलं. सातत्याने सूज असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी या अभ्यास अहवालाची इतर संशोधकांकडून चिकित्सा करणे बाकी आहे. त्याआधीच हा अभ्यास अहवाल MedRxiv वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

ऑक्सफर्डच्या रेडक्लिफ विभागाचे डॉक्टर बेट्टी रमन म्हणाले, “अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर कोरोनाचा शरीरावरील परिणाम शोधणे आणि रुग्णांची देखभाल करण्यासाठी योग्य मॉडेल विकसित करणे गरजेचे आहे.”

‘संसर्गानंतर अनेक महिन्यांपर्यंत शरीर आणि मेंदूत आजाराची लक्षणं’: मागील आठवड्यात ब्रिटेनच्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चच्या (NIHR) अहवालात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर अनेक महिने शरीर आणि मेंदूच्या कामावर परिणाम होत राहतो सांगण्यात आलंय. याला दीर्घ कोव्हिडही म्हटलं जातंय.

ऑक्सफोर्डच्या अभ्यासानुसार, COVID-19 च्या संसर्गानंतर 2-3 महिन्यांनंतरही 64 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो. तसेच 55 टक्के रुग्णांना थकवा जाणवत असल्याचं समोर आलंय.

एमआरआय स्कॅनमध्ये 60 टक्के कोरोना रुग्णांच्या फुफुसावर, 29 टक्के रुग्णांच्या किडनीवर, 26 टक्के रुग्णांच्या ह्रदयावर आणि 10 टक्के रुग्णांच्या यकृतावर परिणाम झालेला दिसला.