कोरोना टेस्ट्बाबत महाराष्ट्राची आघाडी, उत्तर प्रदेश तुलनेत खूपच मागे

0
424

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : कोरोनाचा विळखा देशभरात अधिकच घट्ट होत चालला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात होत आहे. कोरोना व्हायरसची टेस्टिंग जितक्या जास्त प्रमाणात करण्यात येते तितक्याच जास्त प्रमाणात कोरोना पॅझिटीव्ह रुग्ण सापडतात. गेल्या काही दिवसांत एकूण कोरोना रुग्ण व प्रवासी कामगार या मुद्द्यावरून महाराष्ट्र व उत्तरप्रदेश सरकार मध्ये सातत्याने खटके उडत आहेत. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळ जवळ दुप्पट असतानाही त्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या टेस्टिंग लॅब व एकूण टेस्ट्स बाबत उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेत खूप मागे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखाद्या राज्यात नेमके किती रुग्ण आहेत हे जास्तीत जास्त टेस्ट झाल्याशिवाय कळणार नाही असे तज्ञांचे मत आहे. देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने कोरोना टेस्टिंग लॅब व एकूण टेस्ट्स बाबत आघाडी घेतलेली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग मर्यादित व्हावा व कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा सज्ज कराव्यात हा शासनाचा मुख्य उद्देश होता. या काळात कोरोना टेस्टिंगचे किट्स जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध करून टेस्टिंगसाठी एनएबीएल मान्यता प्राप्त लॅब सर्व राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारी नुसार २४ मे २०२० पर्यंत देशात ४२८ शासकीय लॅब व खाजगी १८२ अश्या एकूण ६१० लॅब कोरोना टेस्टिंगसाठी कार्यरत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ४१ शासकीय व खाजगी ३१ अश्या एकूण ७२ लॅब आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये २२ शासकीय व केवळ ५ खाजगी अश्या एकूण फक्त २७ लॅब आहेत. म्हणजे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या तुलनेत कोरोनाचे ५० टेस्टिंग लॅब जास्त आहेत.

देशभरात आत्तापर्यंत एकूण ३२ लाख ४२ हजार १६० कोरोना टेस्टिंग करण्यात आले. महाराष्ट्रात आजवर ३ लाख ९० हजार ७५७ टेस्ट्स करण्यात आले आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२.५ कोटी इतकी आहे. त्या तुलनेत उत्तर प्रदेशची लोकसंख्या तब्बल २३ कोटी इतकी आहे. महाराष्ट्रा पेक्षा दुप्पट लोकसंख्या असताना उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत केवळ २ लाख ४० हजार ५८८ कोरोना टेस्ट करण्यात आले. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राने १० लाख लोकांमागे ३ हजार ३१६ लोकांच्या टेस्ट केल्या आहेत, तर उत्तर प्रदेश मध्ये १० लाख लोकांमागे फक्त १ हजार ६९ लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. तज्ञांचे मते एखाद्या देशात अथवा राज्यात नेमके किती रुग्ण आहेत हे त्या ठिकाणी केलेल्या टेस्ट्सच्या संख्येवर देखील अवलंबून असते. जास्तीत जास्त टेस्ट केल्याशिवाय रुग्णांची नेमकी संख्या कळणार नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये टेस्टचे प्रमाण महाराष्ट्राच्या तुलनेत वाढल्यास त्याठिकाणी महाराष्ट्रापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.