कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाल संगोपन संस्थांमधील बालकांची विशेष काळजी घ्या – बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

0
574

 

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – कोरोना विषाणूच्या प्रसाराची परिस्थिती पाहता राज्यातील बाल संगोपन संस्थांमधील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार ५५४ बाल संगोपन संस्थांमधील सुमारे तेवीस हजार बालकांच्या आरोग्य स्थितीचे सनियंत्रण करण्यासाठी बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी नेमून देण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त राज्यात ५५४ बाल संगोपन संस्था कार्यरत आहेत. यामधील बालकांना ‘कोरोना’ चा धोका उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्याचे निर्देश ऍड. ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार विभागाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सर्व बाल संगोपन केंद्रात जाऊन तेथील ताप, खोकला, सर्दी असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे ताप, खोकला, सर्दी असलेल्या बालकांना विलग करण्याचे व आवश्यकतेनुसार पुढील तपासण्यांची कार्यवाही करण्यात येत आहे.

या बाल संगोपन संस्थांमध्ये केवळ या संस्थांशी संबंधीत अधिकारी- कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच येथील सर्व बालकांना मास्क, हँडवॉश तसेच सॅनिटायजर्स देण्यात आले आहेत. कोरोना पासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.