Banner News

कोरोना गेला कुठे… लोकांची भिती पळाली – विदेशात लॉकडाऊन कडक, मात्र भारतात चारही दिशांना गर्दीचा कहर

By PCB Author

January 25, 2021

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – जवळपास वर्षभर कोरोना साथीने थैमान घातल्याने संपूर्ण देश आणि विश्व ठप्प होते. गेल्या दोन महिन्यांत युरोप, अमेरिकेत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची वेळ आली, मात्र १३५ कोटीच्या आपल्या देशात कोरोना एकदम गायब झाला की काय, असे आश्चर्यजनक चित्र आहे. भारतात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कुठेही पहा गर्दीच गर्दी आहे. ना मास्क, ना सोशल डिस्टंन्सिंग, ना सॅनिटायझरचे बंधन कुठेही पहायला मिळत. पं. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, ममता बॅनर्जी यांच्या भरगच्च सभा होतात. तमिळनाडूत राहुल गांधी यांचा रोडशो आणि सभा खचाखच असते. नवी दिल्लीत गेले दोन महिन्यांपासून लाखो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करून बसून आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक ते मुंबई पायी रॅलीत हजारो शेतकरी एकत्र चालताना दिसतात. जालना शहरात ओबीसी समाजाच्या मेळाव्याला लाखोवर पब्लिक जमा होते. पंढरपूरचे मंदिर पुत्रदा एकादशीला (रविवारी) खुले झाले तर वारकऱ्यांची झुंबड उडाली. तेच चित्र तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या आणि शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आहे. शनिवार, रविवारला जोडून सोमवारची सुट्टी घेऊन २६ जानेवारीमुळे सलग चार दिवस सुट्टी घेणाऱ्यांनी कोकणची किनारपट्टी फुलून गेली आहे. हजारोंच्या उपस्थितीत लग्न सोहळे होतात. शहरातून मंडई आणि बाजारपेठेतील रेलचेल पाहिल्यावर नागरिकांची कोरोनाची भिती पळली आहे, असे दिसते.

बिहार, महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर – बिहार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी कोरोनाच्या संकट काळात एतकी घाई कशासाठी, अशी भाजपा विरोधी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार टीका केली होती. कुठलिही वैद्यकीय सुविधा नसलेल्या या मागास राज्यात निवडणुकीनंतर कोरोनाचा मोठा उद्रेक होईल असेही भाकित काही तज्ञांनी व्यक्त केले होते. प्रत्यक्षात निवडणुकांना तीन महिने झाले. थोडीफार कोरोना रुग्ण संख्या वाढली होती, पण कुठेही कोरोनाचा उद्रेक झाला नाही. महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मतदानासाठी सर्वत्र रांगा होत्या आणि निकालाच्या दिवशीही गावांतून अक्षरशः जत्रेचा माहोल होता. आज पर्यंत एकाही गावात कोरोना रुग्णांचा कहर झाला अथवा हाहाकार झाला असे एकीवात आलेले नाही.

दिल्लीतील शेतकरी मोर्चालाही लाखोची गर्दी – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेले दोन महिन्यांपासून पंजाब आणि हरियाणातील लाखो शेतकऱ्यांनी नवी दिल्लीला अक्षरशः घेराव टाकला आहे. शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी भाजपेतर राजकीय पक्षांनी आपापल्या राज्यात आंदोलन, घरणे, मोर्चे काढले. अनेक राज्यांतून त्याचेही मोठे रेकॉर्ड झाले. नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ठिय्या ओंदोलनामुळे जी गर्दी झाली आहे त्यातून जेष्ठ शेतकऱ्यांना कोरोनाची लागण होईल, साथ वाढेल वगैरे चिंता व्यक्त केली गेली होती. आजपर्यंत तसे काहिही झालेले नाही. देशातील हे सर्व चित्र पाहिल्यावर कोरोनाबद्दल पूर्वी जी भिती होती ती गायब झाली आहे, असेत म्हणावे लागेल.

जालन्यातील प्रचंड मोठी सभा – इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये तसेच ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणाना व्हावी यासाठी जालना शहरात सर्व समाज बांधवांची एक प्रचंड मोठी जाहीरसभा रविवारी झाली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश शेंडगे असे रथीमहारथी नेते उपस्थित होते. जालना शहरातून अभुतपूर्व अशी एक मोठी रॅली संपन्न झाली. सहभागी नागरिकांपैकी कोणीही मास्क वापरला नाही की अंतरा राखून बसले नाहीत. शासनाच्या नियम, निकशांचा पार बोऱ्या वाजला होता. इथेही कोरोनाची भिती कोणालाही सतावताना दिसली नाही.

अद्याप साथ आटोक्यात आलेली नाही – देशातील कोरोना संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नाही असे रविवारचे आकडे सांगतात. अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतोच आहे. मागील २४ तासांत देशभरात १३ हजार २०३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, १३ हजार २९८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ६ लाख ६७ हजार ७३६ वर पोहचली आहे. देशात १ लाख ८४ हजार १८२ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ कोटी ३ लाख ३० हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली असल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय, १ लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयाने ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ जानेवारीपर्यंत १९ कोटी २३ लाख ३७ हजार ११७ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५ लाख ७० हजार २४६ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.