कोरोना औषधाची जाहिरात थांबवा, आयुष मंत्रालयाचे पतंजलीला आदेश

0
340

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : पतंजलीने कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढलं असल्याचा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला होता. पंतजलीचं औषध कोरोनावर गुणकारी असल्याचं पतंजलीने म्हटलं होतं. मात्र भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाची जाहिरात थांबण्याचे आदेश दिले आहेत.

आयुष मंत्रालयाने या औषधा संबंधीची सर्व माहिती मागवली आहे. या औषधा संबंधीच्या संशोधनाबाबतही कोणती माहिती आयुष मंत्रालयाकडे नाही. पतंजलीने क्लिनिकल ट्रायल झाल्याचा दावा केला आहे, त्याचे रिपोर्ट मंत्रालयाकडे आलेले नाहीत. त्यामुळे या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारने पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. 

बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध बनवण्याचा दावा केला आहे. पतंजलीचे बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत औषधाच्या चाचणीत सहभागी असलेले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधकही उपस्थित होते. कोरोनावरील या औषधाला कोरोनिल हे नाव देण्यात आलं होतं.

संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली होती.