Banner News

कोरोना उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयांतील गैरप्रकार टाळण्यासाठी रॅन्डम तपासण्या करण्याची जेष्ट नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी

By PCB Author

May 08, 2021

पिंपरी, दि. 8 (पीसीबी): पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणात कोरोणाचा संसर्ग होत असून रुग्णांना उपचार देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान काही गैरप्रकार सुरु असल्याच्या अनेक घटना पिंपरी चिंचवडसह देशभरात अनेक ठिकाणी घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात प्रचंड दु:ख व रोष निर्माण होत आहे. प्रत्येकवेळा घटना घडून गेल्यावर आपण जागे होतो हे वास्तव आहे. तरी अशा घटना घडू नये अथवा त्याला वेळीच आला बसावा यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी रॅन्डम तपासणी सुरु करा, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा सहा सुचना असलेले एक लेखी निवेदन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना सीमा सावळे यांनी दिले.

निवेदनात पुढील मुद्द्यांचा विचार करण्याची विनंती केली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बहुसंख्य डॉक्टर रेमडेसिव्हिर, टोसिलीझूमॅब, बॅरिसीटीनीब व इतर इंजेक्शन / औषधांचा उपयोग करतात. रेमडेसिव्हिर, टोसिलीझूमॅब, बॅरिसीटीनीब या इंजेक्शन / औषधांचा प्रचंड तुटवडा संपूर्ण देशभरात आहे. रेमडेसिव्हिरसाठी होणारा काळाबाजार व बनावट इंजेक्शनचे वाटप थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय वाटप प्रणाली निश्चित केली. सदर प्रणालीमुळे बाजारतात रेमडेसिव्हिरच्या विक्रीवर बंदी आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या प्रणालीनुसार रुग्णालयांनी आपली मागणी मनपाकडे ऑनलाईन नोंदवायची आहे. त्यानंतर सदर यादीची छाननी करून मनपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सादर केली जाते व जिल्हाधिकारी रेमडेसिव्हिरच्या वाटपाची दैनंदिन यादी जाहीर करतात. बाजारात कुठेही थेट पद्धतीने रेमडेसिव्हिरची ठोक / किरकोळ विक्री करण्यास मनाई आहे हे ज्ञात असतानाही अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील डॉक्टरांच्या वतीने रेमडेसिव्हिर औषध बाहेरून आणण्यासाठी प्रिसक्राईब करण्यात येते. सदर बाब अत्यंत चुकीची असून बाजारात रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण करणारी आहे, तसेच अशा प्रिसक्रिप्शन्समुळे काळाबाजार करणाऱ्यांना संधी मिळते व रुग्णांना बनावट रेमडेसिव्हिर दिल्याचा धोका देखील निर्माण होतो. शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ही बेकायदेशीर पद्धत तातडीने बंद करावी यासाठी तातडीने आदेश देण्यात यावे. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करावी. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर निधन आणि डिस्चार्ज झालेल्या रूग्णांच्या नावे रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सही मागविण्यात आल्याच्या काही प्रकार विविध राज्यात उघडकीस आले आहेत. तसेच रुग्णांच्या नावे मागविलेले इंजेक्शन्स त्याला न देता परस्पर बाहेर च्ध्याभावाने विकल्याच्या अनेक घटना देशभरात घडलेल्या आहेत. नुकतेच पुण्यातही असाच प्रकार उघडकीस आला. काही नतद्रष्ट डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी अशा प्रकारे प्राप्त केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा काळाबाजार करतात. असे प्रकार टाळण्यासाठी मनपाच्या वतीने रॅन्डम तपासणी करण्यासाठी एक भरारी पथक त्वरित तयार करावे. रुग्णालयाला प्राप्त झालेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा वापर कशा पद्धतीने झाले याचा ताळमेळ भरारी पथकाच्या वतीने लावण्यात यावा. तसेच दैनंदिनपणे रुग्णालयांकडून होणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या मागणीची व प्रत्यक्षातील आवश्यकतेची रॅन्डम पडताळणी करण्यात यावी. जेणेकरून रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा काळाबाजार टाळता येईल. तसेच चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना जरब बसेल.

टोसिलीझूमॅब इंजेक्शन्सचा देखील मोठ्याप्रमाणात तुटवडा आहे. बाजारात या इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा असतानाही रुग्णालयातील डॉक्टरांच्या वतीने टोसिलीझूमॅब इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी प्रिसक्राईब करण्यात येते. बाजारात हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अगतिकता निर्माण होते. ३० ते ४० हजार रुपयांचे हे इंजेक्शन काळ्याबाजारात लाखो रुपयांना विकले जात असल्याच्या घटना देखील देशभरात उघडकीस येत आहेत. ज्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या वाटपासाठी प्रणाली तयार केली आहे त्याच प्रमाणे टोसिलीझूमॅब इंजेक्शन्सच्या वाटपासाठी देखील प्रणाली निश्चित करण्यात यावी. अथवा मनपा हद्दीतील सर्व रुग्णालयातील रुग्णांसाठी हे इंजेक्शन वायसीएम मेडिकल स्टोर मध्ये उपलब्ध करावे. तसेच सर्व शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी बाजारातून टोसिलीझूमॅब इंजेक्शन्सचे प्रिसक्रिप्शन्स देण्यास डॉक्टरांना मनाई करण्यात यावी. पैसे घेऊन बेड उपलब्ध करून देण्याचा घृणास्पद प्रकार आपल्या शहरात नुकताच उघडकीस आला आहे. बेंगळूरू शहरात देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. तसेच देशातील इतर शहरात सुद्धा वेगवेगळ्या शक्कल लढवून बेड उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकार समोर येत आहेत. आवशकता नसताना काही रुग्णांना दाखल करून मुद्दामून बेड अडवून ठेवायचे व पैसेवाला रुग्ण आला कि अशा रुग्णाला डिस्चार्ज करून तो बेड द्याचा, असे अत्यंत हीन प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकाराला आळा बसावा यासाठी भरारी पथकाच्या वतीने रॅन्डम तपासणी करण्यात यावी. जेणेकरून अशा घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करता येतील.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अचानकपणे मनपाची रीतसर परवागी घेऊन कुत्राच्या छत्रीप्रमाणे कोविड रुग्णालये सुरु झाले आहेत. त्यापैकी काही रुग्णालये चांगले काम देखील करत आहेत. परंतु अपुऱ्या सुविधा व तज्ञ डॉक्टरांचा आभाव असल्याने काही ठिकाणी रुग्णाची स्थिती खालावत जाते. हाताबाहेर परिस्थिती झाल्यावर रुग्णाला इतर ठिकाणी हलविण्यास भाग पाडले जाते. परंतु दुसऱ्या ठिकाणी वेळेत बेड / उपचार न मिळाल्याने असे रुग्ण दगावतात. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. मनपाची परवागी घेताना अशा रुग्णालयाच्या वतीने दाखविण्यात आलेल्या सुविधा व वैद्यकीय मुनष्य बळ परवानगी मिळाल्यानंतरही उपलब्ध आहे किंवा नाही याचीही रॅन्डम तपासणी भरारी पथकाच्या वतीने होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांचे ५ -६ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पारंपारिक पद्धतीने करण्यासाठी मनपाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य मनपाच्या वतीने मोफत पुरविण्यात येते व स्मशानभूमीत नेमण्यात आलेल्या केअरटेकर संस्थांना प्रती शव ८ हजार रुपये मनपाच्या वतीने देण्यात येते. मात्र स्मशानभूमीचे ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा ठिकाणी सुद्धा अचानकपणे तपासणी मनपाच्या वतीने करण्यात यावी. जेणेकरून कोणताही गैरप्रकार होणार नाही.

प्रसंगवशात उपरोक्त मुद्द्यांबाबत आपण गांभीर्याने विचार करून यथोचित कार्यवाही करावी. उक्त प्रमाणे उल्लेखित बाबींसाठी भरारी पथकाचे गठन करावे आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांना वेळीच आळा घालावा आणि मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या गिधाडांपासून सामान्य जनतेचे रक्षण करावे, अशी मागणी सावळे यांनी केली.