कोरोना आहेच, आता टोळधाडही आली

0
341

नागपूर, दि. २६ (पीसीबी) : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच आता दुसरे मोठे संकट आले आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाड म्हणजेच नाकतोड्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. नवीन संकट उभं राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या संख्येने ही टोळधाड प्रचंड मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील पूर्वी टोकावरील वरुड आणि मोर्शी भागात दिसले होते. मात्र, तिकडे शेती आणि वनस्पतींना फारसं नुकसान न पोहोचवता या टोळधाडीने नागपूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. काल संध्याकाळपासून कोट्यवधी नाकतोड्यांची ही झुंड काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही भागात उडताना दिसले.

कर्कश आवाज करत या नाकतोड्यांनी परिसरातील हिरव्या झाडांवर आपला बस्तान मांडलं आहे. शेतातील हिरवी पिकं आणि हिरव्या झाडांना हे नाकतोडे निशाणा बनवत असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कडुलिंबाची पाने जाळून धूर करत या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे उपायही सुरु केले. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला नाही. काटोल तालुक्यात पारडसिंगा, खामगाव, डोंगरगाव, येरळा तर नरखेड तालुक्यात जलखेडा. भारसिंगी, थडीपवनी या भागात नाकतोडे मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. काही दिवस राजस्थान आणि मध्यप्रदेशात धुमाकूळ घालत पिकांचे मोठे नुकसान केल्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कृषी विभागाने बाधित क्षेत्रात फवारणी करून या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरु केले असले तरी ते प्रयत्न अपुरे ठरत आहेत.
राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून आलं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाहीय.